भाईंदर : मराठीच्या मुद्द्यावर अवघ्या वर्षभरापूर्वी मोठ्या संख्येने मिरा रोड येथे एकवटलेल्या मराठी भाषिक नागरिकांनी मात्र मराठी भाषा गौरव दिनी पाठ फिरवल्याचे समोर आले. परिणामी, शासकीय कार्यक्रम वगळता संपूर्ण शहरात हा दिन निरुत्साहात साजरा झाल्याचे दिसून आले.

मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या मिरा रोड येथील एका दुकानदाराला मनसे पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. या घटनेमुळे मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पेटला होता. त्यामुळे या मुद्द्यावरून मराठी एकीकरण समितीने पुकारलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. हजारोंच्या संख्येने नागरिक मिरा रोड रेल्वे स्थानक परिसरात जमून मराठीचे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेची चर्चा देशपातळीवर झाल्यानंतर काही दिवसांतच राज ठाकरे यांनीही या मुद्द्यावर मिरा रोड येथे जाहीर सभा घेतली होती.

त्यानंतर मिरा-भाईंदरमध्ये अल्पसंख्याक ठरत चाललेला मराठी भाषिक समाज एकत्र येऊन आपले अस्तित्व पुन्हा अबाधित ठेवेल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात होती. मात्र महापालिका, शाळा आणि काही शासकीय कार्यालये वगळता संपूर्ण शहरात मराठी भाषा गौरव दिनाचा फारसा उत्साह दिसून आला नाही. मराठी एकीकरण समितीने शहरातील काही भागांत मराठी भाषेचा गौरव करणाऱ्या रांगोळ्या काढल्या होत्या.

तसेच काही पदाधिकाऱ्यांनी पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना भेट देऊन मराठीबाबत सकारात्मक माहिती दिली. काही सामाजिक संस्थांनी छोटेखानी कार्यक्रमांचे आयोजन करून मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. तर मनसे पक्षाने कार्यक्रम आयोजित करण्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.ज्या तुलनेत आंदोलन उभे करण्यात आले होते, त्या तुलनेत मराठी भाषा गौरव दिन साजरा झाला नसल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली

महापौरांच्या ग्रंथदिंडीने लक्ष वेधले

मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर अमराठी असल्यामुळे सुरुवातीला त्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. दरम्यान, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महापौरांच्या उपस्थितीत मुख्यालय ते नगरभवनपर्यंत ‘ग्रंथदिंडी’काढण्यात आली.या दिंडीत पारंपरिक पोशाख परिधान करून महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांनी तसेच शालेय विद्यार्थिनींनी लेझीम सादर केली. त्यानंतर नगरभवनाच्या तिसऱ्या मजल्यावर इतिहास, विज्ञान, व्यक्तिमत्त्व विकास आदी विषयांवरील मराठी पुस्तकांचे विशेष प्रदर्शन भरविण्यात आले. याशिवाय शहरातील मराठी भाषिक संस्थांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून मराठी भाषेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत, महापौरांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले.