भाईंदर : मिरा रोड मध्ये राहणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीला ६ जणांनी अश्लील छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी काशिगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पीडित मुलगी ही आपल्या आईसोबत राहते. जुन महिन्यात एका शेजारी राहणाऱ्या तरुणाने तिचे कपडे बदलताना व्हिडीओ काढला होता. त्यामुळे हा व्हिडीओ वायरल करण्याची धमकी देत तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करू लागला. मात्र हा प्रकार तिथेच थांबला नाही. आरोपीने हा व्हिडीओ त्यानंतर आपल्या दोन मित्रांना देखील दिला. त्यामुळे त्यांनी देखील पीडित मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान त्यानंतर पुन्हा अन्य ३ आरोपींनी या व्हिडीओच्या आधारे मुलीला बोलावून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी काशिगाव पोलिसांनी ६ जणांविरोधात पोक्सो, बलात्कार तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सर्व आरोपी २५ ते २८ वर्ष वयोगटातील आहेत. मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत आरोपींनी हे कृत्य केले आहे. आम्ही आता पर्यंत २ जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी दिली.
