भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील रेशनकार्डधारकांची गैरसोय दूर करण्यासाठी राज्य शासनाने मिरा रोड येथे स्वतंत्र शिधावाटप कार्यालय सुरू करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय मंगळवारी जारी करण्यात आला.

सध्या मिरा-भाईंदरमधील १४६-ओवळा-माजीवडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना शिधावाटपाशी संबंधित विविध कामांसाठी माजीवडा येथील कार्यालयात जावे लागते. शहराची वाढती लोकसंख्या आणि लाभार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे मिरा रोड येथे स्वतंत्र शिधावाटप कार्यालय सुरू करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांनी राज्य शासनाकडे केली होती.

या मागणीची दखल घेत शासनाने मिरा रोड येथे स्वतंत्र शिधावाटप कार्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. नव्या कार्यालयाच्या अखत्यारीत ३९ विद्यमान आणि तीन अतिरिक्त अशा एकूण ४२ अधिकृत शिधावाटप दुकानांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच कार्यालयासाठी २४ नियमित पदांना मंजुरी देण्यात आली असून, बाह्य यंत्रणेमार्फत चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.या निर्णयामुळे मिरा-भाईंदरमधील रेशनकार्डधारकांना शिधावाटपाशी संबंधित कामांसाठी माजीवडा येथे जाण्याची गरज कमी होणार असून, स्थानिक स्तरावरच अधिक जलद आणि सुलभ सेवा उपलब्ध होणार आहे.