वसई: मिरा भाईंदर शहरात एका व्यक्तीने दुकानाच्या बाहेर विक्री साठी ठेवण्यात आलेला खाद्यतेलाच्या डब्यांची चोरी करून पळ काढला होता. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ ही समोर आला आहे. या व्हिडीओच्या आधारे नयानगर पोलिसांनी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मिरा रोड येथील शांती नगर सेक्टर ७ परिसरात असलेल्या रियास आगवन यांच्या किराणा दुकानात ही चोरीची घटना घडली. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास, जेव्हा दुकानाबाहेर कोणीही नसल्याची संधी साधून एका अज्ञात व्यक्तीने स्कूटीवरून येत दुकानाबाहेर ठेवलेले ‘सनफ्लॉवर’ कंपनीचे प्रत्येकी १५ किलो वजनाचे दोन डबे चोरले. साधारण ७ हजार रुपये किमतीचे हे ३० किलो खाद्यतेल स्कूटीवर ठेवून आरोपीने तिथून पळ काढला होता.
ही संपूर्ण चोरीची घटना दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती, ज्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. दुकानदार आगवन यांनी याप्रकरणी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळाला भेट दिली आणि सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी केली. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला शोधून काढले आणि बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा प्रकारे दुकानाबाहेरून सामान चोरीला जाण्याच्या वाढत्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच, नयानगर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घडलेल्या घटनेनंतर अटक केलेल्या आरोपींने आपल्याकडून चूक झाली आहे अशी चुकी पुन्हा होणार नाही असे सांगत माफी मागितली आहे. त्याचा व्हिडीओ ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
