भाईंदर :-मिरा रोड येथील पेणकरपाडा परिसरात एका इसमाने भररस्त्यात महिलेवर कोयत्याने हल्ला करून तिला जखमी केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मिरा रोड येथील पेणकरपाडा गावात राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये शनिवारी सायंकाळच्या सुमारास वाद झाला होता. या वादानंतर संतप्त झालेल्या एका कुटुंबातील काही पुरुष कोयते घेऊन रस्त्यावर आले.
दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची सुरू असतानाच कोयत्याचा वार एका महिलेच्या डोक्याला लागला. या हल्ल्यात महिला जखमी झाली असून तिच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला. उपस्थित नागरिकांनी ही संपूर्ण घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात चित्रित केली. या प्रकरणी काशीमिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी महेंद्र, बंटी आणि नयन या तिघांना ताब्यात घेतले आहे.
हा वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र भरवस्तीत कोयत्याचा वापर करून झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान यापूर्वी देखील शहरात शुल्लक भांडणात धारदार शस्त्र वापरण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसापूर्वीच मुंबई लोकल ट्रेन मध्ये तरुणांवर चाकूने हल्ला करून तरुणांची हत्या करणारा आरोपी देखील मिरा रोडचा होता. त्यामुळे आरोपीच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊले उचलावी अशी मागणी केली जात आहे.
