वसई: मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या काशिमिरा वाहतूक शाखेत एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने स्वतःच्या सहकाऱ्याकडून मासिक हप्त्याची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर आता प्रशासनाने तातडीने त्यांच्या बदलीचे आदेश देखील जारी केले आहेत.

काश्मीरा वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या एका महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले आणि एका सहाय्यक निरीक्षकाने दरमहा एका मासिक रकमेची (हप्ता) मागणी केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी पैसे मागितल्याचे पुरावे गोळा करून संबंधित महिला कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

त्यानुसार या प्रकरणी चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयामार्फत सहाय्यक पोलीस आयुक्त दयानंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंगोले यांनी पैशांची मागणी केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले. त्यानंतर काशिमीरा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.

या गंभीर प्रकरणानंतर पोलीस आयुक्तालयाकडून वादग्रस्त अधिकाऱ्याची तातडीने बदली करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांची वाहतूक शाखा – १ (काशिमीरा वाहतूक शाखा) येथून तातडीने बदली करण्यात आली असून त्यांची बदली पेल्हार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

तर त्यांच्या जागी प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून आचोळे पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा आदेशदेश ३ एप्रिल रोजी निर्मित करण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.