भाईंदर : – मिरा रोड येथील पूनम इस्टेट क्लस्टर-१मध्ये बकरी ईदच्या वेळी झालेल्या वादानंतर आता नवरात्रोत्सव साजरा करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. दरवर्षीप्रमाणे नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी सोसायटीतील सुमारे १२० कुटुंबीयांनी पदाधिकाऱ्यांकडे परवानगीची मागणी केली. मात्र, सोसायटीने ही मागणी नाकारली असून २८ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत अशा कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, असा ठराव झाल्याचा दाखला देण्यात आला आहे.
पूनम इस्टेट क्लस्टर-१मध्ये एकूण ६२५ सदनिका असून विविध धर्मांचे नागरिक वास्तव्यास आहेत. नवरात्रोत्सवासाठी सोसायटीच्या सामायिक जागेत ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान गरबा, दांडिया आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी रहिवाशांनी नाहरकत दाखला मागितला होता. कार्यक्रमात सोसायटीचे नियम, शासनाच्या सूचना, सुरक्षितता आणि स्वच्छतेचे नियम पाळण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र, सोसायटीने परवानगी नाकारल्याने रहिवासी उमाशंकर नाग यांनी याबाबत तक्रार केली आहे. नियमांचे पालन करून सण साजरे करण्याचा अधिकार असताना सोसायटीने एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यापूर्वीही या प्रकरणी ठाणे तालुका उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. उपनिबंधक कार्यालयाने सोसायटीला तक्रारीतील मुद्द्यांवर कायदा आणि उपविधीनुसार योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.
दरम्यान, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर काही रहिवाशांनी संकुलात बकऱ्या आणून ठेवल्याच्या मुद्द्यावरून याच परिसरात यापूर्वी वाद झाला होता. यावेळी दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याने प्रकरण चर्चेत आले होते. त्यानंतर मिरा भाईंदर महापालिकेने इमारत आवारात बकरी पालन आणि कुर्बानीसंदर्भात नियम लागू केले आहेत.तर सोसायटी कोणत्याही सणाला साजरे करण्याच्या विरोधात नसून मागील वादाच्या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती सोसायटी पदाधिकारी रूपा पिंटो,दानिश शेख आणि मिनाज शेख यांनी दिली आहे.
