भाईंदर :- मिरा रोड येथे पहाटे पाच वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित झाल्याचे समोर आले आहे. परिणामी नागरिकांचे मोठे हाल झाले असून याचा फटका दैनंदिन कामावर बसला आहे.

मिरा-भाईंदर शहरातील बहुतांश भागाला अदानी समूह तसेच काही भागांना टाटा समूहामार्फत वीजपुरवठा केला जातो. या कंपन्यांच्या विद्युत वाहिन्या बहुतांश ठिकाणी भूमिगत करण्यात आल्या असून अखंड व सुरळीत वीजपुरवठ्याची जबाबदारी संबंधित संस्थांवर आहे. मात्र सोमवारी पहाटे अचानक मिरा रोडमधील विनय नगर, प्लेझंट पार्क, दालमिया शाळा परिसरासह अनेक दाट लोकवस्तीच्या भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याची बाब समोर आली आहे.

वीजपुरवठा बंद झाल्याने नागरिकांना पाणीपुरवठा, लिफ्ट सेवा, इंटरनेट तसेच इतर अत्यावश्यक सुविधांमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वीज नसल्याने कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली, तर अनेक व्यावसायिक आस्थापनांचे कामकाजही सुरु होऊ शकलेले नाही.तर काही दुकाने आणि कार्यालये देखील बंद राहिल्यामुळे आर्थिक फटकाही बसल्याचे दिसून येत आहे.

याशिवाय घरामध्ये रुग्ण असलेल्या कुटुंबांनाही वीज नसल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे संतप्त नागरिकांनी संबंधित वीज वितरण कंपनीकडे तक्रारींचा पाऊस पाडला आहे. दरम्यान, तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम सुरू असून दुपारपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली असल्याचा दावा केला जात आहे