भाईंदर :- मिरा रोड परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या प्रमुख भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने हजारो नागरिकांना तब्बल २४ तास अंधारात राहावे लागल्याची घटना समोर आली आहे. याशिवाय अदानी वीज कंपनीकडून वेळोवेळी स्पष्ट माहिती न देण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मिरा-भाईंदर शहराला अदानी वीज आणि टाटा पॉवर या खासगी कंपन्यांकडून वीजपुरवठा केला जातो. यामध्ये अदानी वीज कंपनीचे ग्राहक मोठ्या संख्येने आहेत. रविवारी मध्यरात्री मिरा रोडमधील प्लेझंट पार्क, पूनम गार्डन, विनय नगर आणि सृष्टी या दाट लोकवस्तीच्या भागांतील वीजपुरवठा अचानक खंडित झाला. हा पुरवठा पूर्ववत करण्यासाठी मंगळवारी मध्यरात्र उजाडल्याने नागरिकांना जवळपास २४ तासांहून अधिक काळ त्रास सहन करावा लागला.
आठवड्याच्या सुरुवातीलाच वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. घरगुती कामांसह कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला, तर दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.या भागात वीजपुरवठा करण्यासाठी दोन भूमिगत वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. यापैकी एका वाहिनीत यापूर्वीच बिघाड झाला होता. त्यामुळे दुसऱ्या वाहिनीवर अतिरिक्त भार पडत होता. सध्या वाढलेल्या उकाड्यामुळे विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने उर्वरित वाहिनीवरही ताण निर्माण झाला आणि अखेर दोन्ही वाहिन्यांमध्ये बिघाड झाला.
अदानी वीज कंपनीने आवश्यक ती पूर्वतयारी आणि खबरदारी घेतली नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तसेच एक वाहिनी आधीपासूनच बंद असताना पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.नागरिकांच्या वाढत्या संतापानंतर काही सोसायट्यांमध्ये जनरेटरची व्यवस्था करण्यात आली. मात्र, त्यातूनही पुरेसा वीजपुरवठा मिळत नसल्याने रहिवाशांचे हाल झाले. अखेर सोमवारी रात्री नवीन वीजवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
दरम्यान, बिघाडाचे नेमके कारण, दुरुस्तीची प्रगती आणि वीजपुरवठा सुरळीत होण्याचा कालावधी याबाबत कंपनीकडून योग्य माहिती देण्यात आली नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या संदर्भात अदानी वीज कंपनीच्या अधिकृत जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.
