वसई :- मिरा रोड येथील एका उच्चभ्रू गृहसंकुलात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकऱ्या आणण्यावरून सुरू झालेल्या वादाला आता हिंसक आणि राजकीय वळण लागले आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेविरोधात आक्रमक पवित्रा घेत सोसायटी परिसरात आंदोलन केले. यादरम्यान हनुमान चालीसा पठण, घोषणाबाजी आणि चक्क डुकरांना सोसायटीत नेण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. या संपूर्ण वादात आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उडी घेतली असून, त्यांनी सोसायटीत भेट देत स्थानिक मुस्लिम नेत्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

​मिरा रोड येथील ‘पुनम क्लस्टर’ या विविध धर्मीय नागरिक वास्तव्यास असलेल्या गृहसंकुलात काही मुस्लिम रहिवाशांनी दोन दिवसांपूर्वी बकरी ईदच्या कुर्बानीसाठी बकऱ्या आणून ठेवल्या होत्या. गृहसंकुलात आणि उघड्यावर अशा प्रकारे प्राणी आणण्याला इतर शाकाहारी, जैन आणि हिंदू रहिवाशांनी तीव्र आक्षेप घेतला.

यावरून सोसायटीमध्ये वादाची ठिणगी पडली. ​सोमवारी रात्री या वादाचे रूपांतर थेट बाचाबाची आणि हाणामारीत झाले. आंदोलनकर्त्यांचा एका मुस्लिम व्यक्तीसोबत वाद झाला, ज्यामध्ये त्या व्यक्तीने ब्लेडने हल्ला केल्याचा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले.

‘नया नगर’ला मिनी पाकिस्तान बनवण्याचा प्रयत्न- किरीट सोमय्यांचा आरोप

​मंगळवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या वादग्रस्त सोसायटीला भेट दिली आणि पोलीस तसेच स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी “काही मुस्लिम नेते ‘नया नगर’ परिसराला पाकिस्तानी वृत्तीचा गड आणि मिनी पाकिस्तान बनवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. हिंदू, शाकाहारी आणि जैन कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी जबरदस्तीने गृहसंकुलांमध्ये बकऱ्या आणल्या जात आहेत. धार्मिक उत्सव साजरा करण्याच्या नावाखाली हा ‘जिहादचा विकृत स्वरूप’ आहे आणि हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही,” असा घणाघात सोमय्या यांनी केला.

​सोमय्या पुढे म्हणाले की, “कुर्बानीसाठी महापालिकेने मटण शॉप किंवा मार्केटमध्ये वेगळी व्यवस्था करावी. पण कोणत्याही गृहसंकुलात किंवा चाळीत उघड्यावर बकरा कापण्याची परवानगी दिली जाणार नाही. प्रशासनाने आता कारवाई सुरू केली असून, बहुतांश बकऱ्या सोसायटीतून बाहेर काढण्यात आल्या आहेत.” तसेच त्यांनी तीन आठवड्यांपूर्वी याच परिसरात एका चौकीदाराला ‘कलमा’ वाचायला लावून त्याच्या हत्येचा प्रयत्न झाल्याचाही गंभीर पुनरुच्चार केला.

बकरे बाहेर काढण्यास सुरुवात

मिरारोडमधील पूनम क्लस्टर या खाजगी गृहसंकुलात बकरी ईदनिमित्त आणलेल्या बकऱ्या ट्रकमध्ये भरून गृहसंकुलाबाहेर रवाना करण्यात आल्या आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी “पूनम इस्टेट सोसायटी, मीरा रोड येथे बकरी ईद कुरबानी होणार नाही. आता सोसायटी मधून सर्व बकरे काढण्यात आले”, अशा मथळ्यासह हा व्हिडिओ शेअर केला आहे.