वसई: पश्चिम रेल्वे मार्गावरील मिरारोड रेल्वे स्थानकाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सुधारणा कामांना गती देण्यासाठी स्थानकावरील एका महत्त्वाच्या पदचारी पुलाचा (फुट ओव्हर ब्रिज) जिना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि कामाच्या सुलभतेसाठी बंद करण्यात आला आहे.पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) सध्या मिरारोड स्थानकात व्यापक ‘स्टेशन इम्प्रूव्हमेंट स्कीम’ अंतर्गत विविध विकासकामे करत आहे.

या प्रकल्पाचा एक भाग म्हणून फलाट क्रमांक २ आणि ३ वर असलेल्या दुसऱ्या उत्तर पदचारी पुलाचा दक्षिण बाजूचा जिना हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बांधकाम आणि पाडकामादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी हा जिना प्रवाशांच्या वापरासाठी बंद करण्यात आला आहे.

मिरारोड स्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. फलाट क्रमांक २ आणि ३ वरून मुख्यत्वे चर्चगेट आणि बोरीवलीच्या दिशेने जाणाऱ्या तसेच येणाऱ्या लोकल गाड्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. जिना बंद केल्यामुळे गर्दीच्या वेळेत प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या असुविधेबाबत प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे आणि प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.