भाईंदर :मिरा रोड रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या परिसरात कचऱ्याचे ढिगारे पडले असल्याचे समोर आले आहे. यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

मिरा रोड रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या स्थानकाबाहेर अनेक दुकानदार असून रस्त्यावर फेरीवाले व रिक्षाचालक उभे असतात. परिणामी हजारो नागरिकांच्या रहदारीमुळे येथे मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. यात प्लास्टिक साहित्य आणि भाज्यांच्या कचऱ्याचा सर्वाधिक समावेश आहे.प्रामुख्याने हा कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेने सफाई कर्मचारी नियुक्त केले आहेत.

त्यानुसार दिवसातून दोन वेळा येथील कचरा जमा करून एका बाजूला ठेवला जातो. मात्र कचरा गोळा केला जात असला तरी तो नियमितपणे उचलण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. परिणामी स्थानकाबाहेर काही ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचत आहेत.तसेच साचलेला कचरा पाहून अनेक जण त्यावर आणखी कचरा टाकत आहेत. त्यामुळे या कचऱ्यातून डास आणि दुर्गंधी पसरू लागली आहे. यामुळे रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.दरम्यान, रेल्वे स्थानक व इतर परिसरात नियमित स्वच्छता केली जात असून एखाद्या ठिकाणी कचरा दिसल्यास त्याबाबत प्रशासनाला माहिती द्यावी,असे आवाहन महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

स्थानक परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्णय कागदावरच:

मिरा रोड आणि भाईंदर रेल्वे स्थानके स्वच्छ व अतिक्रमणमुक्त ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी विशेष ठराव करून सुरक्षा रक्षक व इतर यंत्रणा उभी करण्यात आली आहे. मात्र असे असतानाही दोन्ही स्थानकांवरील समस्या कायम असून प्रशासनाचे निर्णय कागदावरच राहिल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.