भाईंदर :- मिरा रोड रेल्वे स्थानकाजवळील जलवाहिनीला गळती लागल्यामुळे मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याची बाब समोर आली आहे. शहरात पाणीकपात लागू असतानाही जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मिरा रोड रेल्वे स्थानक परिसरातील विविध कामांसाठी महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी स्वतंत्र जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. यातील रेल्वे रुळाजवळून जाणाऱ्या एका जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. मात्र, अद्याप या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मिरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरण आणि एमएमआरडीएकडून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत रेल्वे स्थानकाजवळ जलवाहिनीला गळती लागून पाणी वाया जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
