मिरा रोड : विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट यांसारखे कंदमूळ पदार्थ न आणण्याचे केलेले आवाहन अखेर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेवेन स्क्वेअर अकॅडमी शाळा प्रशासनाने मागे घेतला आहे. या संदर्भात पालकांना पाठवलेला संदेश डिलिट केला आहे.
पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर शाळेने विद्यार्थ्यांच्या डब्यात कंदमूळ पदार्थ न आणण्याचे आवाहन केले होते. तसेच शाळेच्या कॅन्टीनमध्येही कांदा, लसूण आणि बटाटा वापरला जाणार नसल्याचे सांगण्यात आले होते. या निर्णयाला मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच स्थानिक भूमिपुत्रांकडून विरोध करण्यात आला होता.
राजकीय नेत्यांनीही या निर्णयावर टीका केली होती.विरोध वाढल्यानंतर शाळा प्रशासनाने संबंधित पत्रक मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या डब्याबाबत करण्यात आलेले आवाहन आता लागू राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, यापूर्वी आमदार नरेंद्र मेहता यांनी विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले होते. पर्युषण काळात प्राणीहिंसा टाळण्याच्या उद्देशाने पालकांना केवळ विनंती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
