भाईंदर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील काशीगाव परिसरात सर्पविषाची तस्करी करणाऱ्या तिघांना पोलीस आणि वनविभागाने अटक केली आहे. दोडिया पेट्रोलपंपाजवळ केलेल्या कारवाईत कोब्रा जातीच्या सापाचे असल्याचा संशय असलेले विष, दुचाकी आणि तीन मोबाइल असा एकूण ५ कोटी २१ लाख ८० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काशीगाव येथील दोडिया पेट्रोलपंपाजवळ गुरुवारी सायंकाळी सर्पविषाची विक्री होणार असल्याची माहिती पोलीस आणि वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. फैजान अब्दुल अजीज (३०), अब्दुल करीम रशीद अहमद शेख (५१) आणि मोहम्मद दानीश फयीम खान (२३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींकडून काचेच्या बाटल्यांमध्ये ठेवलेले सर्पविष जप्त करण्यात आले. बाटल्यांसह त्याचे वजन ३९३ मिलीग्रॅम, तर निव्वळ विषाचे वजन २५० मिलीग्रॅम असल्याची नोंद आहे. हे विष कोब्रा जातीच्या सापाचे असल्याचा प्राथमिक संशय आहे. याशिवाय तस्करीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी आणि तीन मोबाइलही जप्त करण्यात आले आहेत.

मुंबई वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपाल युवराज जोशी यांच्या तक्रारीवरून वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ आणि भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे पुढील तपास करीत आहेत.

जप्त केलेले सर्पविष आरोपींकडे कुठून आले आणि त्याची विक्री कोणाला केली जाणार होती, याचा तपास पोलीस करीत आहेत. या तस्करीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचाही शोध घेतला जात आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.