भाईंदर : मिरा रोड रेल्वे स्थानकाबाहेर गेली सुमारे चाळीस वर्षे वृत्तपत्र विक्री करणाऱ्या विक्रेत्याला महापालिकेने हटविण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे मिरा-भाईंदर वृत्तपत्र विक्रेता संघटना नाराज झाली असून, प्रशासनाने सवलत द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन अधिकाऱ्यांना दिले आहे.

मिरा रोड रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात फेरीवाल्यांचा मोठा विळखा पडला आहे. फेरीवाल्यांची वाढती संख्या लक्षात घेता प्रवाशांना स्थानकाबाहेर ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नागरिकांकडून महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात येत आहेत. त्यानुसार स्थानक परिसर मोकळा करून त्याचे सुशोभीकरण करण्याचे धोरण महापालिकेने निश्चित केले आहे.

या धोरणानुसार स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत असून, स्टॉलधारकांना नोटिसा बजावून जागा खाली करण्यास सांगण्यात आले आहे. याच कारवाईअंतर्गत स्थानकाबाहेर गेली सुमारे चाळीस वर्षे वृत्तपत्र विक्री करणाऱ्या विक्रेत्यालाही नोटीस देण्यात आली आहे.राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्याचे शासनाचे धोरण असल्याने या निर्णयाबाबत सोमवारी मिरा-भाईंदर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक पत्रकारांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी संबंधित नोटिशीला लेखी उत्तर देऊन आपली बाजू मांडण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला. तसेच, भविष्यात आवश्यक वाटल्यास याच परिसरात उपलब्ध जागेत संबंधित वृत्तपत्र विक्रेत्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासनही अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती संघटनेने दिली.