वसई: पश्चिम रेल्वे उपनगरिय गाड्यांमधील दिवसेंदिवस वाढ चाललेल्या गर्दीमुळे प्रवास हा अत्यंत जिकरीचा बनला सातत्याने अपघाताच्या घटना ही समोर येत आहेत. पश्चिम रेल्वेच्या मीरा रोड ते वैतरणा या स्थानकांदरम्यान रेल्वे अपघातांची मालिका सुरूच आहे. गेल्या पावणेपाच वर्षांत या मार्गिकेवर तब्बल ९८४ जणांचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये १५९ घटना या आत्महत्येच्या असल्याचे रेल्वे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
सुरूवातीला मीरा रोड ते वैतरणा या ३१ किलोमीटरच्या संपूर्ण पट्ट्यासाठी वसई रेल्वे पोलीस ठाणे कार्यरत होते. मात्र, प्रवाशांची सतत वाढणारी संख्या आणि अपघातांचे प्रमाण लक्षात घेता, ५ ऑगस्ट रोजी या पोलीस ठाण्याचे विभाजन करून भाईंदर आणि वसई ही दोन स्वतंत्र पोलीस ठाणी स्थापन करण्यात आली आहेत.
गेल्या काही वर्षांत विरार, नालासोपारा, वसई आणि नायगाव स्थानकांतून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. गर्दीमुळे अनेक प्रवाशांना लोकलला लटकून प्रवास करावा लागतो आणि तोल जाऊन अपघात घडतात. नुकतेच २३ सप्टेंबर रोजी नालासोपारा ते वसई दरम्यान लोकल ट्रेनमधील तुफान गर्दीमुळे एका ३५ वर्षीय तरुणाचा चालत्या ट्रेनमधून नाल्यात पडून मृत्यू झाला होता.
अनेक प्रवासी वेळेची बचत करण्यासाठी थेट रेल्वे रुळ ओलांडतात. भरधाव लोकल किंवा एक्स्प्रेस गाड्यांच्या कचाट्यात सापडून ते जीव गमावतात. वैतरणा ते विरार आणि नालासोपारा ते वसई हे पट्टे अपघातांचे प्रमुख हॉटस्पॉट ठरत असल्याचे रेल्वे पोलिसांनी नमूद केले.
१५९ जणांची रेल्वेत आत्महत्या
२०२२ ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत झालेल्या ९८४ मृत्यूंपैकी १५९ जणांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. कौटुंबिक कलह, मानसिक तणाव किंवा आर्थिक विवंचनेतून व्यक्ती टोकाचे पाऊल उचलण्यासाठी रेल्वे मार्गिकेवरील निर्जन पट्ट्यांचा वापर करत असल्याचे तपासात पुढे आले आहे.
बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्याचे आव्हान
रेल्वे अपघातात काही मृतदेहांचे चेहरे किंवा अवयव छिन्नभिन्न झाल्यामुळे त्यांची ओळख पटवणे रेल्वे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान ठरत आहे. अथक प्रयत्न करूनही वसई, नालासोपारा व भाईंदर परिसरातील तब्बल २७९ मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून मृतदेहांचे फोटो काढणे, विविध स्थानकांवर व सार्वजनिक ठिकाणी माहिती फलक लावणे आणि प्रवाशांकडे विचारपूस करणे अशा प्रकारचा तपास केला जात आहे. नियमानुसार मृतदेह ७ दिवस ठेवता येत असला तरी, वारसांचा शोध घेण्यासाठी ते १५ ते २० दिवस शवागरात जतन केले जातात. या कालावधीतही ओळख पटली नाही तर डीएनए नमुने राखून ठेवून नियमानुसार अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, वसई-विरार शहरातील शवागरातील शवपेट्या (फ्रीझर) वारंवार बंद अवस्थेत असल्याने या बेवारस मृतदेहांचे जतन करताना पोलिसांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे.
“या वर्षी रेल्वेतील गुन्हेगारी आणि रेल्वे अपघात कमी करण्याच्या दृष्टीने आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.” – राजू महानोर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रेल्वे पोलीस ठाणे)
“नवीन तयार झालेल्या भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन ते अडीच महिन्यांत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार ‘शून्य अपघात मिशन’ या उपक्रमांतर्गत जनजागृती मोहीम राबवली जात आहे.” — गणेश तुंबडा (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भाईंदर रेल्वे पोलीस ठाणे)
पोलिसांकडून उपाययोजना
- रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी गस्त घालणे.
- नवीन हॉटस्पॉट्स शोधून तेथे उपाययोजना करणे.
- ज्या ठिकाणी संरक्षक जाळ्या नाहीत, तेथे जाळ्या -बसवण्यासाठी रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू आहे.
- रेल्वे स्थानक परिसरात सातत्याने जनजागृती मोहिमा राबवणे.
