वसई: अमलीपदार्थांच्या वाढत्या विळख्याला लगाम घालण्यासाठी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने धडक कारवाई सुरू केली आहे. मिरा रोड परिमंडळ-१ अंतर्गत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी १ कोटी ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एकूण २३ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये २ परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.
मागील वर्षभरापासून वसई विरार व मिराभाईंदर शहरात अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रकार समोर येत आहेत. यात मेफेड्रोन, गांजा, हेरॉईन, कोकेन अशा विविध प्रकारच्या अमली पदार्थांचा समावेश आहे. अशा घटना रोखण्यासाठी मिरारोड परिमंडळ १ ने २० ते २६ ,एप्रिल या दरम्यान विशेष अमली पदार्थ विरोधी मोहीम राबविली होती. या मोहिमेत परिमंडळ अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाणी सहभागी झाली होती.
या मोहिमेदरम्यान अंमली पदार्थांची विक्री, साठा आणि सेवन करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलण्यात आली आहेत. यात १.४ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत यात एमडी- ४४३.९ ग्रॅम, कोकेन- ९६.२९, एक किलोहून अधिक गांजा, हेरॉईन ४८.३८ ग्रॅम, ब्राऊन शुगर ८ ग्रॅम, कफ सिरफ -३२०० मिली अशा स्वरूपात अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात १८ गुन्हे दाखल करून २३ जणांना अटक केली यात २ परदेशी नागरिकांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ १ पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण, पोलीस उपायुक्त ( गुन्हे ) संदीप डोईफोडे, विभागीय सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या पथकाने पार पाडली आहे.
अमली पदार्थ सेवन करणाऱ्यावर कारवाई
शहरात सार्वजनिक ठिकाणी, आडोशाला, रस्त्या लगत अशा ठिकाणी काही जण अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचे प्रकार समोर येत असतात त्यांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहेत. अमली पदार्थ सेवन करणाऱ्या ९२ व्यक्तींवर कारवाई करीत १२ गुन्हे दाखल केले आहेत.
