भाईंदर :- मिरा रोड येथील विनय नगर परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद झाले असून वाहतूक कोंडीसह विविध समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. विनय नगर भागात मोठ्या प्रमाणात निवासी संकुले असल्याने येथे वाहनांची वर्दळ कायम असते. प्रशासनाने येथील रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले असले तरी मागील काही दिवसांपासून रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहने उभी केली जात आहेत.

यामध्ये ट्रक, बस तसेच मोठ्या चारचाकी वाहनांचा समावेश आहे.यामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतुकीच्या वेळी कोंडीची समस्या तीव्र होत आहे. तसेच या वाहनांमधून मार्ग काढताना वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. काही ठिकाणी या अवजड वाहनांची धुलाई व दुरुस्तीची कामेही रस्त्यावरच केली जात असल्याने परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरत आहे.

यापूर्वी अशाच प्रकारे उभ्या असलेल्या खासगी बसमधून एका लहान मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नयेत व नागरिकांना मोकळा रस्ता मिळावा यासाठी ही वाहने तातडीने हटवावीत, अशी मागणी स्थानिक नागरिक रवी खरात यांनी केली आहे.दरम्यान, नागरी वस्तीत अवैधरित्या उभी करण्यात येणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

वाहनतळासाठी जागेचा अभाव

मिरा भाईंदर शहरात अवजड वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी शुल्क आकारून जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. मात्र अद्याप या वाहनतळासाठी जागेची निश्चिती झालेली नसल्याने संपूर्ण शहरात अवजड वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न कायम आहे.