भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये मेट्रोसह उभारण्यात आलेला तिसरा उड्डाणपूल चार मार्गिकांवरून पुढे दोन मार्गिकांचा होत असल्यामुळे संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे हा पूल सुरू करण्यापूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत वाहतूक सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. सल्लागारांच्या अहवालानुसार पूल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

मिरा भाईंदरमधील रस्ते वाहतुकीसाठी अपुरे पडत असल्यामुळे मेट्रो मार्गिकेसोबत मुख्य मार्गांवर एमएमआरडीएकडून तीन उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. यापैकी दोन पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले असून दीपक हॉस्पिटल ते फाटक दरम्यान उभारण्यात आलेल्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी या पुलाच्या रचनेवरून मोठा वाद निर्माण झाला. चार मार्गिकांचा असलेला पूल फाटकाजवळ उतरताना अचानक दोन मार्गिकांचा होत असल्याचा मुद्दा समोर आला. पुलाच्या या रचनेवरून एमएमआरडीएवर टीकेची झोड उठली आहे.

वाद पेटल्यानंतर वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुलाची पाहणी करून काही आवश्यक बदल करण्याच्या सूचना प्राधिकरणाला दिल्या आहेत. मात्र पुलाखाली जागा उपलब्ध नसल्यामुळे सखोल अभ्यास करूनच हा पूल उभारण्यात आल्याचा दावा प्राधिकरणाकडून वारंवार करण्यात येत आहे.

सदर पुलाचे काम आता पूर्ण झाले असून तो वाहतुकीसाठी खुला करण्याची वेळ आली आहे. मात्र पूल सुरू झाल्यानंतर अपघात झाल्यास पुन्हा प्राधिकरणालाच जबाबदार धरले जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या वादातून मार्ग काढण्यासाठी एमएमआरडीएकडून वाहतूक सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. सल्लागार पुलाची पुनर्तपासणी करून आपला अहवाल सादर करणार आहेत. पुलावरील वाहतुकीत काही बदल सुचवले जाण्याची शक्यता असून, त्यानंतरच पूल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

खर्चात वाढ

मिरा-भाईंदर येथील दीपक हॉस्पिटल ते फाटक मार्गावरील आझाद मैदानापर्यंत सुमारे १८०० मीटर लांबीचा हा दुमजली पूल उभारण्यात आला आहे. या कामासाठी कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र पुलाची उभारणी जवळपास पूर्ण झाल्यानंतर त्याच्या रचनेवर आक्षेप नोंदवण्यात आले. परिणामी एमएमआरडीएकडून पुन्हा लाखो रुपये खर्च करून वाहतूक सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. भविष्यात सल्लागारांनी रचनेत बदल करण्याच्या सूचना दिल्यास कोट्यवधी रुपयांच्या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.