scorecardresearch

पोलीस बंदोबस्तात एमएमआरडीएची वृक्षतोड ; राज्यमार्गावरील चारोटी ते तलवाडा दरम्यान नाकाबंदी

नगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मीरा-भाईंदर व वसई-विरार महानगरपालिका क्षेत्राकरिता पाणी नेण्यासाठी डहाणूतील वेती येथे जल वहिनी टाकण्यात येत आहे.

डहाणू : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मीरा-भाईंदर व वसई-विरार महानगरपालिका क्षेत्राकरिता पाणी नेण्यासाठी डहाणूतील वेती येथे जल वहिनी टाकण्यात येत आहे. गुरुवारी वेती आणि सूर्या नगर येथील कामातील वृक्षतोड कडक पोलिस बंदोबस्तामध्ये करण्यात आली. राज्यमार्गावरील चारोटी ते तलवाडा दरम्यान यावेळी नाकाबंदी करण्यात आली.
वसई-विरार आणि मिरा-भाईंदर शहर तसेच परिसरातील २७ गावे यांच्या पाणीपुरवठय़ात सुधारणा करण्यासाठी वेती सुर्यानगर येथे सतरा हेक्टर जमिनीमध्ये एमएमआरडीएच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. ४०३ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेची पाणीपुरवठयाच्या प्रस्तावित प्रकल्पाच्या कामासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरीसुद्धा वेती ग्रामस्थ, भूमिसेना, वनहक्क समिती, कष्टकरी संघटना, पाणी हक्क परिषद यांचा या भूसंपादनाच्या कामाला प्रखर विरोध आहे.
या नियोजित जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या क्षेत्रात असणारम्य़ा १हजार ६४ हून अधिक मोठी झाडे तर लाखो लहान झाडांची यापूर्वी वृक्षतोड करण्यात आली आहे. तर गुरुवारी पोलीस बंदोबस्तात उर्वरित वृक्षतोडीचे नियोजन करण्यात आले होते. प्रकल्पासाठी खजुरी, निलगीरी, हेद, करंदा, साग, जांभूळ, काजू, वड, अशोका, लाजरा आदि मुल्यवान झाडे तोडण्यात आली. जलवाहिनीच्या भूसंपादनाला स्थानिकांचा विरोध असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान आंदोलकांच्या घरासमोर पोलीसांनी बंदोबस्त ठेवून राज्यमार्गावरील चारोटी, कासा, वरोती, सुर्यानगर, कवडास, तलवाडा दरम्यान नाकाबंदी केल्याने नागरिकांना पोलीसांच्या अडवणुकीचा त्रास सहन करावा लागला. वृक्षतोड करण्यासाठी कोणालाही जाऊ दिले नाही यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण होते.
एमएमआरडीए प्रकल्पासाठी ज्या पर्यावरण प्राधिकरणाची परवानगी घेऊन हा प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. ती समिती सुप्रीम कोर्टाने बरखास्त केली आहे. त्यामुळे आमचा या कामाला विरोध आहे. – प्रकाश हाडळ, अध्यक्ष वनहक्क समिती

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mmrda deforestation police custody blockade between charoti talwada state highway amy

ताज्या बातम्या