भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू असताना झालेल्या अपघाताची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने गंभीर दखल घेतली आहे.या कामातील निष्काळजीपणाबद्दल संबंधित ठेकेदाराला १० लाख आणि सल्लागार संस्थेवर ५ लाखाचा दंड आकरण्यात आला आहे.मिरा भाईंदर शहराच्या मुख्य मार्गांवर एमएमआरडीएकडून रस्त्यांचे डांबरीकरण आणि दुरुस्तीची कामे सुरू आहेत.दरम्यान काही दिवसापूर्वी सुरू असलेल्या कामादरम्यान दुचाकीस्वार घसरून अपघात झाल्याची घटना घडली होती. यात चालकाला गरम डांबर चिपकल्यामुळे हात एका बाजूने जळाला होता.त्यामुळे याबाबत तक्रारी आल्यानंतर एमएमआरडीएने तातडीने घटनास्थळी पाहणी करून चौकशी केली होती.
त्यानंतर कामातील हलगर्जीपणाबद्दल संबंधित ठेकेदार जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्सवर १० लाख रुपयांचा, तर कामाचे सल्लगार सिस्ट्रा–सीईजी–एसएमसीआयपीएल या सल्लागार संस्थेवर ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच संबंधित ठिकाणी मजबूत बॅरिकेडिंग, परावर्तित इशारा फलक, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थापनासह सर्व सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महापालिकेकडून देखील इशारा
मिरा-भाईंदर महापालिका प्रशासनानेही एमएमआरडीए आणि संबंधित यंत्रणांना सर्व रस्ते दुरुस्तीची कामे सुरक्षित आणि नियमानुसार पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. सुरू असलेल्या सर्व कामांची नियमित पाहणी करून आवश्यक त्या त्रुटी तातडीने दूर करण्याचे आदेश देण्यात आले असून, नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याची माहिती प्रशासनाने पत्रक काढून जाहिर केली आहे.
