भाईंदर: मिरा भाईंदरमध्ये मेट्रोसमांतर उभारण्यात आलेल्या वादग्रस्त उड्डाणपुलाची चर्चा सध्या जगभर रंगली आहे. मात्र या रचनेप्रकरणी सल्लागार, अभियंता आणि कंत्राटदाराविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचा दावा एमएमआरडीए प्रशासनाने केला आहे. मिरा भाईंदर शहरात मेट्रो मार्गिकेसोबत उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या रचनेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. चार मार्गिकांचा असलेला पूल फाटकाजवळ उतरताना अचानक दोन मार्गिकांचा होत असल्याचा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला. या रचनेवरून एमएमआरडीएवर टीकेची झोड उठली होती.
वाद चिघळल्यानंतर संबंधित पूल योग्य असून भविष्यातील वाहतूक वाढ लक्षात घेऊनच त्याची रचना करण्यात आल्याचा दावा प्राधिकरणाकडून करण्यात आला. याबाबतचे अधिकृत पत्रक आणि भूमिका समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आली होती.मात्र नागरिकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे वाद शमवण्यासाठी प्राधिकरणाने वाहतूक सल्लागाराची नियुक्ती केली. त्यानंतर पुलाच्या रचनेत काही बदल करण्यास सुरुवात झाल्याचे दिसून आले. पुलावरून फाटकाकडे उतरताना उभारण्यात आलेला नवा दुभाजक प्रशासनाने हटविला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अधिक मोकळी जागा उपलब्ध होऊन वाहनचालकांचा प्रवास अधिक सुलभ होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या पुलाची व्यापक चर्चा झाल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी एमएमआरडीएकडे अर्ज दाखल करून सविस्तर माहिती मागवली आहे. प्रकल्पाची कागदपत्रे मागविण्यासोबतच या वादग्रस्त रचनेप्रकरणी सल्लागार, अभियंता आणि कंत्राटदाराविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता.
यावर सार्वजनिक माहिती अधिकारी व कार्यकारी अभियंता निलेश महाले यांनी ४ मार्च २०२६ रोजी दिलेल्या उत्तरात संबंधित बाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणात प्राधिकरणाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नसून सर्व संबंधितांना सरसकट माफी देण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांकडून करण्यात येत आहे.
