भाईंदर :-मुंबई उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मेट्रो प्रकल्पाच्या कामांमध्ये एमएमआरडीएने अतिरिक्त खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. उडण्याचा किंवा कोसळण्याचा धोका असलेली पत्रे हटविण्यासह, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणी कामे तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रविवारी झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ठाणे तसेच मिरा-भाईंदर शहरातील बांधकामाधीन मेट्रो स्थानकांवरील काही लोखंडी पत्रे उडाल्याच्या आणि कोसळल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मेट्रोच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर यांत्रिक साहित्य व तात्पुरती संरक्षक पत्रे वापरली जातात. वादळी वारे आणि अतिवृष्टीच्या काळात ही पत्रे धोकादायक ठरू शकतात. त्यातच बहुतांश कामे मुख्य रस्त्यांलगत आणि मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी सुरू असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी एमएमआरडीएने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर अर्धवट अवस्थेत बसविण्यात आलेली आणि वाऱ्यामुळे उडण्याची शक्यता असलेली पत्रे कुशल कामगारांच्या मदतीने हटवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.यात भाईंदर येथील दीपक हॉस्पिटलजवळ उभारण्यात येत असलेल्या नानासाहेब धर्माधिकारी मेट्रो स्थानकावरील काही पत्रे हटविण्यात आली आहेत. याशिवाय, अतिवृष्टी आणि वादळी हवामान कायम असताना परिस्थितीनुसार आवश्यक त्या ठिकाणी मेट्रोच्या बांधकामाची कामे तात्पुरती स्थगित ठेवण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.
