वसई : ​‘नीट’ पेपरफुटी प्रकरण आणि तरुणांवर होणाऱ्या अन्यायावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अमित ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. पेपर फुटीमुळे तब्बल २१ मुला-मुलींनी आत्महत्या केल्या आणि दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार झाला, तरीही सरकारने कोणतीही संवेदनशील किंवा योग्य भूमिका घेतली नाही. मात्र, जेव्हा तरुणांची खरी ताकद दिसली आणि केंद्रातून राजीनामे आले, तेव्हाच सरकारला या तरुण पिढीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याची आठवण झाली, असा थेट टोला त्यांनी लगावला.

शनिवारी विरार येथील नवीन विवा महाविद्यालयात तरुणांशी संवाद साधण्यासाठी एका विशेष ‘युवा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मनसे नेते अमित ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. अमित ठाकरे महाविद्यालय परिसरात पोहोचताच विद्यार्थी व नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. मोठ्या संख्येने जमलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती. कार्यक्रमापूर्वी अमित ठाकरे यांनी विरारच्या न्यू विवा कॉलेज परिसरामध्ये ‘मनसे विद्यार्थी सेना स्टँड’चे अधिकृत उद्घाटन केले. यानंतर त्यांनी वसई-विरार शहर महापालिकेचे महापौर अजीव पाटील आणि माजी आमदार क्षितीज ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली.

​यादरम्यान उपस्थितांशी व माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे यांनी आजच्या तरुण पिढीच्या जागरूकतेचे आणि संघटित होण्याचे मोकळेपणाने कौतुक केले. दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला, मात्र महाराष्ट्र सरकारने या गंभीर विषयावर केंद्र सरकारला अद्याप कोणताही जाब विचारलेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

​आजची तरुण पिढी खूप विचारपूर्वक पावले उचलत आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यांतील घडामोडींवरून आम्हाला या तरुणांकडूनच प्रेरणा आणि शिकवण मिळाली आहे. त्यामुळे त्यांना वेगळा सल्ला किंवा सूचना देण्याची अजिबात गरज नाही ते जे करत आहेत, ते अगदी योग्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

​संकटाच्या काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेतृत्व तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यामुळेच आजच्या तरुण पिढीचा त्यांच्यावर दृढ विश्वास, प्रेम आणि आदर आहे, असेही अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले.