भाईंदर : विधानसभा निवडणुकीपूर्वी मिरा-भाईंदरमधील खड्ड्यांवरून एटीव्ही बाईक चालवत तत्कालीन भाजप नेते नरेंद्र मेहता यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. त्याच कृतीची आठवण करून देत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी हटकेश सिग्नल ते गोल्डन नेस्ट मार्गावर एटीव्ही बाईक चालवून मेहता आणि भाजपलाच लक्ष्य केले आहे.
२०२२ मध्ये सुमारे २२ कोटी रुपये खर्चून छत्रपती शिवाजी महाराज मार्ग ते गोल्डन नेस्ट हा रस्ता तयार करण्यात आला होता. या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. तसेच या रस्त्याची पाच वर्षे देखभाल आणि दुरुस्ती एमएमआरडीए व संबंधित ठेकेदाराने करणे अपेक्षित असतानाही मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.मनसेचे विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
कार्यकर्त्यांनी खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावर एटीव्ही बाईक चालवत घोषणाबाजी केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मेहता यांनी याच पद्धतीने एटीव्ही बाईक चालवून तत्कालीन प्रशासनावर टीका केली होती. त्यावेळी त्यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. आता मेहता आमदार असून महापालिकेतही भाजपची सत्ता असतानाही रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या कायम असल्याचा आरोप करत मनसेने त्याच पद्धतीने आंदोलन छेडले.काही दिवसांपूर्वी एमएमआरडीएने या मार्गावरील खड्डे बुजविल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था अद्यापही खराब असून वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा दावा मनसेने केला आहे.रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
