भाईंदर : काशिमीरा परिसरात महापालिकेने उभारलेल्या आनंद दिघे चौकाची दुरवस्था झाल्याने त्याच्या तातडीने दुरुस्तीची मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांची भेट घेतली.
काशिमीरा परिसरात सुमारे तीन वर्षांपूर्वी महापालिकेने आनंद दिघे चौकाची उभारणी केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चौकाच्या देखभाल व दुरुस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसेने केला आहे. परिणामी चौकावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असून परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचा दावा करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर अविनाश जाधव यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह आयुक्त राधा बिनोद शर्मा यांची भेट घेऊन चौकाच्या दुरवस्थेबाबत निवेदन सादर केले. आनंद दिघे यांच्या स्मृतीशी संबंधित चौकाकडे झालेले दुर्लक्ष अयोग्य असल्याचे सांगत त्यांनी तातडीने दुरुस्तीची मागणी केली. प्रशासनाकडे आर्थिक अडचण असल्यास मनसे स्वखर्चाने चौकाचे पुनर्सुशोभीकरण करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावर आयुक्त शर्मा यांनी लवकरच चौकाची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. याच बैठकीत महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, सफाई कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन अदा करणे आदी विषयही जाधव यांनी उपस्थित केले. या मागण्यांबाबत पाठपुरावा करण्यासाठी पंधरा दिवसांनंतर पुन्हा आयुक्तांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
