भाईंदर : मिरा रोड परिसरात एका खाद्यपदार्थ विक्रेत्याने मराठीऐवजी थेट गुजराती भाषेत दुकानाची पाटी लावल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित पाटीवर काळे फासून निषेध व्यक्त केला. मिरा-भाईंदर शहरात मराठी-अमराठी भाषेच्या मुद्द्यावर मागील काही वर्षांपासून अधूनमधून वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे शहरातील वातावरण शांत राहावे यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, मिरा रोड येथील अमर पॅलेस परिसरात अंड्यापासून बनविल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे दुकान चालवणाऱ्या विक्रेत्याने दुकानाचे नाव ‘सुरती घोटाळा’ असे ठेवून पाटी पूर्णपणे गुजराती भाषेत लावल्याची बाब समोर आली. याबाबत मनसेकडून आक्षेप नोंदवण्यात आला असून, महापालिकेकडेही तक्रार केल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
मात्र प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करत मनसे मिरा-भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे यांनी शनिवारी संबंधित दुकानाच्या पाटीवर काळे फासले. तसेच पुढील काळात दुकानाचा नामफलक मराठी भाषेत लावावा, असा इशारा त्यांनी दुकानदाराला दिला. राज्यातील दुकानांच्या नामफलकांवर मराठी भाषा असणे बंधनकारक असल्याचा शासन निर्णय असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची टीका यावेळी करण्यात आली. मराठीचा अवमान करणाऱ्या प्रकारांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा मनसेकडून आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही राणे यांनी दिला.
