scorecardresearch

घंटा वाजणार मात्र पालक मुलांना पाठविण्याबाबत साशंक

सर्व शाळांकडून अहवाल मागविले आहेत. यात शाळांना विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमती पत्रक घेणे आवश्यक असणार आहे.

घंटा वाजणार मात्र पालक मुलांना पाठविण्याबाबत साशंक

विरार : राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. यासाठी शाळांनी आपली तयारी दाखवली असली तरी मात्र पालकांच्या मनात भीती कायम आहे. यामुळे बहुतांश पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास नापसंती दर्शवली आहे. शुक्रवारी या संदर्भात पालघर जिल्हाधिकारी यांच्या सोबत जिल्हा शिक्षण समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.   

बैठकीत तालुकानिहाय आढावा घेतला जाणार आहे. ग्रामीण भाग आणि शहरी भाग अशा गटात वर्गवारी करून करोना वैश्विक महामारीच्या संदर्भातला आढावा घेतला जाईल तसेच संभाव्य धोक्याची टेहळणी करून निर्णय घेतले जातील.  

सर्व शाळांकडून अहवाल मागविले आहेत. यात शाळांना विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमती पत्रक घेणे आवश्यक असणार आहे. जे पालक मुलांना शाळेत पाठविणार नाहीत, त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शाळा भरवली जाणार आहे.

 तसेच शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची दररोज चाचणी केली जाईल, शाळेत निर्जंतुक द्रव, वर्गाचे निर्जंतुकीकरण, सामाजिक दुरीकरण या संदर्भातले पत्र शाळांना पाठविले असल्याची माहिती जिल्हा शिक्षण अधिकारी संगीता भागवत यांनी दिली.

 दरम्यान पालघर जिल्ह्यातील शिक्षण विभागाकडून करोना काळात अनेक निर्णय घेताना समयसूचकता न दाखवता विलंबाने निर्णय घेतले  गेल्यामुळे शालेय समितीचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांची धावपळ होते. हे काही निर्णयांवर सिद्ध झाले आहे. निर्णय झाल्यास केलेल्या सूचना ग्रामीण भागांत दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांंपर्यंत पोहोचणे कठीण होते हे प्रशासनाला माहीत असूनसुद्धा तोच प्रकार पुन्हा होत आहे. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीची सुट्टी असून ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर ४ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्र असलेले शाळा बंद ठेवणे गरजेचे होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने या बैठकीचे आयोजन यापूर्वी केले असते तर ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास अधिक सुलभता व सुस्पष्टता आली असतील, असे शिक्षण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

साडेतीन लाख मुलांच्या पालकांचा नकार

महाराष्ट्र राज्य शिक्षण आयोगाने केलेल्या सर्वेक्षणात पालघर जिल्ह्यात तीन ते १८ वयोगटात जिल्ह्यात एकूण सहा लाख ७६ हजार १७२ विद्यार्थी आहेत. यातील दोन लाख ९६ हजार ५७२ पालकांनी कोविडनंतर आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास होकार दिला. तर तीन लाख ७९ हजार ६०० पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यास नकार दिला आहे. वसईत ४०० शाळा या पाचवी ते १२ पर्यंतच्या आहेत. 

जिल्ह्य़ातील समितीची आज बैठक

 पाचवी ते बारावी वर्ग   ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याबाबत पालघर जिल्ह्याने  अजूनही  निर्णय घेतलेला नाही.   या संदर्भात शुक्रवारी समितीची बैठक होणार आहे.  जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत जिल्हाधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच शिक्षण अधिकारी यांची समिती गठित करण्यात आली आहे.  शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय समितीमर्फत घेण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Most o parents do not want their children to go school zws

ताज्या बातम्या