scorecardresearch

सुरक्षा रकमेबाबत महावितरणची लपवाछपवी

वसई-विरार परिसरात विजेच्या लपंडावाने हैराण झालेल्या ग्राहकांना महावितरण विभागाने मागील महिन्यापासून दुप्पट अतिरक्त सुरक्षा रक्कम भरण्याची देयके पाठवली आहेत.

विरार : वसई-विरार परिसरात विजेच्या लपंडावाने हैराण झालेल्या ग्राहकांना महावितरण विभागाने मागील महिन्यापासून दुप्पट अतिरक्त सुरक्षा रक्कम भरण्याची देयके पाठवली आहेत. ही रक्कम भरण्यास सहा हप्तय़ांची मुभा असतानाही महावितरण विभागाने जाणीपूर्वक ही बाब लपवून ठेवल्याचा आरोप वीज ग्राहक संघटनेने केला आहे. सुरक्षा रक्कम वसूल करण्यासाठी महावितरण विभागाने चालवलेल्या लपवाछपवीमुळे ग्राहकांत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
करोनाकाळात आलेल्या वाढीव बिलांचा दणका अजूनही अनेक ग्राहक सहन करत आहेत. त्यातच भर उन्हाळय़ात महावितरण विभागाकडून वेगवेगळय़ा कारणाने भारनियमन केले जात आहे. असे असतानाही वाढीव देयके येणे मात्र थांबलेले नाही. यामुळे ग्राहक मेटाकुटीला आला आहे. मागील महिन्यापासून महावितरण विभागाने अतिरक्त सुरक्षा ठेवीचे देयकसुद्धा पाठविण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा ठेव रक्कम पूर्वी एक महिन्याच्या बिलाइतकी होती. आता ती दुप्पट म्हणजे दोन महिन्यांच्या बिलाइतकी करण्यात आली आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ही रक्कम भरण्यासाठी विनियमामध्ये सहा हप्तय़ांची तरतूद केली आहे. तथापि महावितरणने स्वत:च्या सोयीसाठी ही सवलत डावलून हप्ते न देता ग्राहकांनी एकरकमी संपूर्ण रक्कम भरावी अशी मागणी केली. यामुळे ग्राहकांच्या चिंता अधिकच वाढल्या आहेत. एकरकमी देयके भरताना अनेकांना अडचणी येत आहेत. यामुळे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने महावितरण विभागाला जाब विचारला असता, विभागाने ग्राहकांना सहा हप्तय़ांत रक्कम भरता येईल असे संदेश मोबाइलवर पाठविण्यास सुरुवात केली आहे. पण अनेक ग्राहकांचे मोबइल क्रमांक नोंदणीकृत नसल्याने त्यांना हे संदेश प्राप्त होणार नाहीत.
यासंदर्भात माहिती देताना महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे म्हणाले, वास्तविक महावितरण कंपनीने सुरक्षा ठेव मागणी देयकामध्ये विनियम क्र. १३.४ प्रमाणे सुरक्षा ठेवीच्या एकूण सहा हप्तय़ांपैकी पहिला हप्ता रकमेची मागणी करायला हवी होती. विनियमानुसार आयोगाने ग्राहकांना सहा अथवा कमी हप्तय़ांत रक्कम भरण्याची दिलेली सवलत स्पष्टपणे कळवायला हवी होती. परंतु महावितरणने ते जाणीवपूर्वक टाळत केवळ पैसे गोळा करण्याचा हेतू ठेवला आहे. त्यामुळे ग्राहकांनी जागरूक होत, सहा हप्तय़ांची सवलत घेऊनच ही सुरक्षा ठेव भरणा करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Msedcl secrecy regarding security amount electricity vasaivirar area amy