वसई: गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर मुंबई, पालघरसह महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या विविध विभागातील १३ हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याची पोस्ट व्हायरल होत आहे. मात्र, या भरती प्रक्रियेबाबत एसटी महामंडळाने केलेल्या खुलाशामुळे अनेक इच्छुक अर्जदारांचा हिरमोड झाला आहे.
एसटी महामंडळाकडून वेळोवेळी शासकीय व निमशासकीय भरती प्रक्रिया राबविल्या जात असतात. शासनाचे अधिकृत संकेतस्थळ, प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांमधून या भरती प्रक्रियांची माहिती इच्छुक अर्जदारांना मिळते. गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर अशीच एक पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. ज्याची चर्चा नोकरी शोधणाऱ्या तरुण-तरुणींमध्ये सुरु आहे.
व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये नेमकं काय?
समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होणारी पोस्ट एसटी महामंडळाचा लोगो आणि घोषवाक्यासह प्रसारित करण्यात आली आहे. यात मुंबई, अमरावती, नागपूर , नाशिक, पुणे व छत्रपती संभाजीनगर या सहा विभागात ११, ८७० चालक, ७४० वाहक, व ९५७ लिपिक अशा एकूण १३ हजार ५६७ निमशासकीय पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच या प्रत्येक पदासाठी देण्यात येणाऱ्या वेतनाचा तपशीलही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आला आहे.
अर्ज प्रक्रियेची माहितीच नाही
व्हायरल पोस्टमध्ये जरी पदे, त्यासाठी लागू करण्यात आलेले वेतन आणि कोणत्या विभागात भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे? याची माहिती देण्यात आली असली, तरी उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज कसा करावा याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
एसटी महामंडळाचा खुलासा काय?
व्हायरल पोस्टचा फोटो अधिकृत एक्स खात्यावर पोस्ट करत, “अशी कोणतीही भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राबविण्यात येत नाही. कृपया, अफवांवर विश्वास ठेवू नका”, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.
