भाईंदर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील काशिमीरा उड्डाण पुलावर भरधाव चारचाकी वाहन अवजड वाहनाखाली घुसल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मिरा रोड येथे राहणारे पाच तरुण चारचाकी वाहनातून फाउंटन हॉटेलच्या दिशेने जात होते. काशिमीरा उड्डाण पुलावर त्यांच्या वाहनाचा ताबा सुटल्याने ते समोरील अवजड वाहनाखाली घुसल्याचे सांगितले जात आहे.

अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर कारचा अक्षरशः चुराडा झाला. वाहनाचे इंजिनही रस्त्यावर फेकले गेले होते. दुर्घटनेनंतर काही काळ महामार्गावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना तातडीने महामार्गालगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य चार जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. काशिमीरा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.