वसई:- मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जनावरांच्या कळपाला धडक दिल्याने पाच जनावरांचा मृत्यू झाला, तर दोन जनावरे जखमी झाली. मृत जनावरांमध्ये दोन गायी आणि तीन बैलांचा समावेश आहे. हा अपघात बुधवारी दुपारी सकवार गावाच्या हद्दीत घडला.
सकवार गावाच्या हद्दीतून गुरुवारी दुपारी गाय-वासरांचा कळप जात होता. दुपारी अडीचच्या सुमारास हा कळप मुंबई अहमदाबाद महामार्गावरून जात असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने कळपाला जोरदार धडक दिली. वाहनाची धडक बसल्याने काही जनावरे महामार्गावर फेकली गेली. या अपघातात दोन गायी आणि तीन बैलांचा मृत्यू झाला. तसेच अन्य दोन जनावरे जखमी झाली आहेत.
अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळावर न थांबता वाहनासह पळ काढला. त्यामुळे अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाची आणि चालकाची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२५ आणि २८१ तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांनी सांगितले आहे.
सध्या पावसाळा असल्याने जंगलात भटकणारी जनावरे ही महामार्ग व अन्य रस्त्यावर मोकाट फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व महापालिका यांना पत्र पाठविले जाणार असल्याने ही पोलिसांनी सांगितले आहे.
