वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रस्ते ओलांडून प्रवास होऊ नये यासाठी ठीकठिकाणी संरक्षण जाळ्या लावण्यात येत आहेत. तर काही ठिकाणी पादचारी पूल ही तयार करण्यात आले आहेत. मात्र तरी सुद्धा नागरिक जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडून जाण्याचा प्रयत्न करीत आहे. नुकताच महामार्गावर रस्ते ओलांडून जाणाऱ्या पादचाऱ्याला हायाबुसा दुचाकीची जोरदार धडक लागली यात पादचाऱ्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबई,ठाणे, वसई विरार, मीरा भाईंदर, पालघर यासह गुजरातला जोडणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गालगतच अनेक छोटे मोठे गाव पाडे आहेत. या भागातील नागरिकांना दळणवळण करण्यासाठी महामार्गाचा वापर करावा लागतो तर काही वेळा धोकादायक पध्दतीने महामार्ग ओलांडून प्रवास करावा लागतो. अशा वेळी अनेकदा अपघाताच्या घटना समोर येत असतात.यापूर्वी सुद्धा रस्ते ओलांडून प्रवास करताना अनेक घटना घडल्या आहेत. काही जणांचा मृत्यू झाला आहे.

या महामार्गावर मागील काही वर्षांपासून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रस्ते ओलांडून प्रवास करणे अधिकच धोकादायक बनले आहे. यासाठी ज्या ठिकाणी गाव पाडे आहे आहेत त्यांना दोन्ही बाजूने ये जा करण्यासाठी पादचारी उड्डाणपूल तयार करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. यासाठी महामार्ग प्राधिकरणा तर्फे वर्सोवा पुलापासून ते पालघरच्या अच्छाड पर्यँत दहा ठिकाणी पादचारी पूल तयार करण्यात आले आहेत.विरार बावखळ टोकरेपाडा, वंगणपाडा नालासोपारा, शिवेचापाडा, कोल्ही चिंचोटी, ससूपाडा अच्छाड,जव्हार फाटा, दुर्वेस व अन्य दोन ठिकाणे यांचा समावेश आहे. यासाठी सुमारे ६९ कोटी रुपये इतका निधी खर्च केला आहे.

दुसरीकडे मोकाट जनावरे व नागरिकांनी महामार्ग ओलांडून जाऊ नये यासाठी काही ठिकाणी संरक्षण जाळ्या ही बसविण्यात आल्या आहेत.
मात्र तरी सुद्धा अनेकजण महामार्ग ओलांडून धोकादायक प्रवास करीत आहेत.

नुकताच महामार्गावरील चिंचोटी येथील साधना हॉटेलजळ ईश्वर साव (१९) हा तरूण रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी शाहरूख चालवत असलेल्या दुचाकीचे नियंत्रण सुटले आणि त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पादचारी ईश्वर साव या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. त्याला धडक दिल्यानंतर दुचाकी शंभर मीटर पर्यंत दूरवर फेकली गेली. गंभीर जखमी असलेल्या शाहरूख आणि अर्जुन यांचाही काही वेळात त्यांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. या घडलेल्या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा महामार्गाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

प्रवाशांनी रस्ते ओलांडून धोकादायक प्रवास करू नये यासाठी सुरक्षा जाळ्या लावल्या आहेत. तर काही ठिकाणी पादचारी पूल ही तयार करून दिले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी त्या पुलाचा वापर करावा असे आवाहन महामार्ग प्राधिकरणाने केले आहे.

मागील वर्षी घडले २१६ अपघात
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध विविध ठिकाणी पडलेले खड्डे, वाहतूक नियोजनाचा अभाव, वाहनचालकांची निष्काळजी अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे अपघातांच्या घटना घडल्या आहे. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत असल्याने एकप्रकारे महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला आहे. मागील वर्षभरात महामार्गावर २१६ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात ८१ जणांचा मृत्यू झाला आहे.तर ११५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
यात काही अपघात रस्ते ओलांडून जात असताना घडले आहेत.