वसई:- मुंबई-अहमदाबाद या अत्यंत गजबजलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. गेल्या अवघ्या दहा दिवसांत वर्सोवा ते पालघर या टप्प्यात तब्बल चार अवजड वाहने उलटण्याच्या घटना घडल्या आहेत. महामार्गाची दुरवस्था आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे.
वसई पूर्वेकडून जाणाऱ्या या महामार्गावर दररोज हजारो वाहनांची प्रचंड वर्दळ असते. मात्र, रस्त्यावर करण्यात आलेल्या व्हाईट टॉपिंगचे (काँक्रिटीकरण) अनेक पॅनेल्स खचल्याने ठिकठिकाणी रस्ता उंच-सखल झाला आहे. या खराब रस्त्यांमुळे आणि चालकांच्या वेगावरील नियंत्र सुटल्याने भरधाव जाणारी अवजड वाहने अनियंत्रित होऊन पलटी होत आहेत. तर दुसरीकडे काही अवजड वाहनचालक ही भरधाव वेगाने वाहन चालविताना अनियंत्रित होत आहेत.
महामार्गावर अपघात झाल्यानंतर अथवा वाहन बंद पडल्यास ते तातडीने बाजूला हटवण्यासाठी सक्षम यंत्रणेचा अभाव दिसून येत आहे. अपघातग्रस्त वाहने हटवण्यासाठी तब्बल ३ ते ४ तास लागतात. परिणामी, महामार्गावर सहा ते सात किलोमीटरच्या अंतरापर्यंत रांगा लागून वाहतुकीचा मोठा खेळखंडोबा होतो. या कोंडीत रुग्णवाहिकाही अडकून पडत असल्याने रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. मुंबई-अहमदाबाद हा अत्यंत व्यस्त मार्ग आहे. अपघात झाल्यास किंवा वाहन बंद पडल्यास ते तातडीने बाजूला करण्यासाठी सक्षम यंत्रणा असायला हवी. महामार्गावरील या कोंडीमुळे सर्वसामान्यांचे हाल होतातच, शिवाय रुग्णवाहिका अडकून रुग्णांचा जीव धोक्यात येतो असे जागरूक नागरिक आशिष कदम यांनी सांगितले.
अवघ्या १० दिवसांतील अपघातांच्या घटना
२१ सप्टेंबर २०२६ तवा, पालघर येथे दुधाचा टँकर पलटी होऊन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दूध सांडले.
२४ सप्टेंबर २०२६ वसई तुंगारफाटा येथे सकाळी ८ च्या सुमारास केमिकलचा टँकर अनियंत्रित होऊन उलटला.
२५ सप्टेंबर २०२६ तलासरी, ठक्करबाप्पा परिसर येथे गुजरात वाहिनीवर क्रूड ऑइलची वाहतूक करणारा टँकर पलटी
ऑइल गळतीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला.
२९ सप्टेंबर २०२६ वसई सातीवली येथे गुजरात वाहिनीवर कंटेनर उलटला. हा कंटेनर ६ तासांपेक्षा जास्त वेळ रस्त्यातच पडून राहिल्याने दिवसभर तीव्र वाहतूक कोंडी झाली.
दहा दिवसांत चार अवजड वाहने उलटणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. अपूर्ण काँक्रिटीकरण, असमतोल रस्ता, अचानक बदलणाऱ्या लेन आणि सुरक्षेचा अभाव यामुळे हे अपघात होत आहेत. काँक्रिटीकरण पूर्ण होण्यापूर्वीच दुरुस्ती करावी लागत असल्याने कामाच्या दर्जावर प्रश्न निर्माण होतो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामाची स्वतंत्र गुणवत्ता तपासणी करून दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी, अन्यथा पुढील दुर्घटनेची सर्व जबाबदारी अधिकारी व ठेकेदारांची असेल :- सुशांत श्रीकांत पाटील (अध्यक्ष, भूमिपुत्र फाउंडेशन, वसई- विरार)
”महामार्गावर जिथे खड्डे पडले आहेत अथवा काँक्रिट पॅनेल्स खचले आहेत, त्यांच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. याशिवाय महामार्गावर नियमित पेट्रोलिंग केले जात असून, अपघातग्रस्त किंवा बंद पडलेली वाहने तातडीने हटवण्यासाठी क्रेनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.” :- सुहास चिटणीस , प्रकल्प व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
