भाईंदर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर उभारण्यात आलेल्या नव्या उड्डाणपुलावर उद्घाटनाच्या अवघ्या महिन्याभरातच खड्डे पडल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दहिसर चेकनाका ते फाउंटन हॉटेलदरम्यान सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत.

ही समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर दोन ठिकाणी लहान उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोरील पुलाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.हा पूल २० मीटर लांबीचा, ५.५ मीटर उंचीचा आणि २२ मीटर रुंदीचा असून, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

या पुलाच्या उद्घाटनावरून सुरुवातीला वाद निर्माण झाला होता. त्यानंतर महिनाभरापूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्घाटन करून हा पूल वाहतुकीसाठी खुला केला होता. पूल सुरू झाल्यामुळे महामार्गावरील वाहतुकीला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पावसाच्या हजेरीनंतर पुलावर खड्डे पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वापराच्या अवघ्या काही दिवसांतच पुलावर खड्डे पडल्याने प्रवाशांकडून प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

परिवहन मंत्र्यांकडून नाराजी

महामार्गावरील या पुलाचे काम परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. पुलावर खड्डे पडल्याचे समोर आल्यानंतर सरनाईक यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे याबाबत जाब विचारत तातडीने खड्डे बुजविण्याचे आदेश दिले. त्यानुसार नुकतेच खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले आहे. तसेच कामात गैरप्रकार आढळल्यास संबंधित कंत्राटदारावरही कारवाई करण्यात येणार असल्याचा दावा सरनाईक यांनी केला आहे.