भाईंदर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पांडुरंगवाडी येथील प्रस्तावित भुयारी मार्गाचे काम अनेक महिने उलटूनही रखडले आहे. वर्षभरात या ठिकाणी १६ अपघात झाले असूनही कामाला सुरुवात झाली नसल्याने परिवहन मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
मिरा भाईंदर महापालिका हद्दीतून जाणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा गुजरात, पालघर, ठाणे आणि मुंबईदरम्यान वाहतूक करणारा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावर दिवसभर अवजड आणि हलक्या वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र, महामार्गाच्या दोन्ही बाजूंना राहणाऱ्या नागरिकांसाठी सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्याची सुविधा अद्याप उपलब्ध झालेली नाही.
पांडुरंगवाडी परिसरात महामार्ग ओलांडताना गेल्या वर्षभरात १६ अपघात झाले आहेत. यापैकी सात अपघात वाहनांचे, तर नऊ अपघात पादचाऱ्यांशी संबंधित आहेत. त्यामुळे या ठिकाणी भुयारी मार्ग उभारण्याची मागणी होत होती. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भुयारी मार्गाला मंजुरी दिली. मात्र, अनेक महिने उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.
दरम्यान गेल्या आठवड्यात महापालिकेत झालेल्या विकासकामांच्या आढावा बैठकीत सरनाईक यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. वाहतुकीचे नियोजन करणे कठीण असल्याचे कारण अधिकाऱ्यांनी पुढे केले. यावर सरनाईक यांनी नाराजी व्यक्त करत नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन भुयारी मार्गाचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. अन्यथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
या वेळी उपस्थित वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनीही या ठिकाणी भुयारी मार्गाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. तसेच काम सुरू करण्यासाठी आवश्यक वाहतूक नियोजन करण्यास पोलिस प्रशासन तयार असल्याचे सांगितले. त्यामुळे रखडलेल्या भुयारी मार्गाच्या कामाला आता सुरुवात होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्र्याकडे तक्रार
पांडुरंगवाडी येथील भुयारी मार्गाचे काम वाहतुकीची समस्या निर्माण होण्याचे कारण देत कंत्राटदाराने परस्पर थांबवले होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही या भूमिकेला संमती दर्शवली होती. मात्र, या ठिकाणी सातत्याने अपघात होत असल्याने सरनाईक यांनी काम पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले. याबाबत सूचना देण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी चिटणीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने सरनाईक यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधला. या भुयारी मार्गाच्या उभारणीबाबत गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा सरनाईक यांनी केला आहे.
