वसई: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या नशिबी सध्या ‘रस्त्यावरची प्रतीक्षा’ आली आहे. वसई पूर्व भागातून जाणाऱ्या या महामार्गावर प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी बस थांबे तर उभारले, पण देखभालीअभावी या थांब्यांची अक्षरशः धूळधाण झाली आहे. मोडकळीस आलेले पत्रे आणि अस्वच्छतेमुळे प्रवाशांना उन्हापावसात रस्त्याच्या कडेला उभे राहून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

वसई पूर्वेच्या भागातून महामार्ग गेला आहे. या मार्गालगत अनेक छोटी मोठी गावे असून दररोज या महामार्गावरून मोठ्या संख्येने प्रवासी हे महापालिका व एसटी महामंडळाच्या बसेस मधून ठाणे, मुंबई, वसई विरार असा प्रवास करतात. या प्रवाशांना थांबण्यासाठी महामार्गावर ठीक ठिकाणी बस थांबे तयार केले आहेत. परंतु काही ठिकाणी असलेल्या थांब्याची अक्षरशः बिकट अवस्था झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. नायगाव, बापाणे, चिंचोटी, वसई फाटा, विरार यासह अन्य ठिकाणच्या भागात हे बस थांबे आहेत. मात्र यातील बहुतांश बस थांबे मोडकळीस आले आहेत. तर काही ठिकाणी बस थांब्याच्या समोरच वाहने उभी केली जातात. त्यामुळे बस नेमकी कुठे थांबणार असा प्रश्न पडतो. तर दुसरीकडे त्याच्या बसण्याच्या जागेची ही धूळधाण, घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे.या थांब्यावर प्रवाशांना थांबता येत नसल्याचे प्रवाशांची सांगितले आहे.

विरार फाटा येथील दोन्ही बाजूचे बस थांबे ही जीर्ण झाले आहेत. त्यावरील छप्पर ही लोंबकळत आहेत. या बस थांब्याची वेळीच रंगरंगोटी व देखभाल होत नसल्याने ही अवस्था झाली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रमेश सोनावणे यांनी सांगितले आहे.या बस थांब्याच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांना ऊन असो की पाऊस रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागत आहे. यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी तयार केलेल्या बस थांब्यांची पाहणी करून योग्य ती दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

प्रवासी निवारा शेडची मागणी

वसई विरारसह जिल्ह्यात विविध ठिकाणच्या भागात एसटीच्या बसेस सेवा देत आहेत. त्या ठिकाणच्या भागात प्रवाशांना थांबण्यासाठी निवारा शेड तयार करण्यात यावेत अशी मागणी आम्ही शासनस्तरावर केली आहे. जवळपास आम्ही १५० इतकी मागणी केली असून टप्प्या टप्प्याने ते तयार केले जातील. सद्यस्थितीत ३५ प्रवासी निवारा शेडचे काम सुरू केले जाईल असे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक कैलास पाटील यांनी सांगितले.

स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

शहरात प्रवाशांच्या सोयीसाठी बस थांबे तयार केले जातात. मात्र ते तयार झाल्यानंतर त्याकडे लक्ष दिले जात नाही. महामार्गावर दररोज मोठ्या संख्येने प्रवासी एसटी व अन्य बस ने प्रवास करतात. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने बस थांबे तयार करणे व जे नादुरुस्त आहेत त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे