वसई:- मागील काही वर्षांपासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गासह वसई विरार शहरातील अंतर्गत रस्त्यावर, मोकळ्या जागेत राडारोडा आणून टाकण्याचे प्रकार वाढले आहे. विशेषतः मुंबईच्या भागातून अशी वाहने शहरात राडारोडा आणून टाकत आहेत. नुकताच नायगाव पोलिसांनी राडारोडा टाकणाऱ्या वाहनाला रंगेहाथ पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मुंबई यासह अन्य ठिकाणी इमारतींचा पुनर्विकास व अन्य विकास कामे झपाट्याने सुरू आहेत. त्यामुळे खोदकाम, जुनी बांधकामे तोडणे त्यामुळे मोठ्या प्रमाणात राडारोडा बाहेर निघत आहे.

या राडारोड्याची विल्हेवाट लावण्याऐवजी थेट मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वसई विरार शहराच्या हद्दीत आणून टाकला जात आहे. रात्रीच्या सुमारास छुप्या मार्गाने मुंबई व अन्य भागातील राडारोड्याने भरलेली वाहने महामार्गालगत खाली केली जात आहेत. वर्सोवा पुलापासून ससूनवघर, मालजीपाडा, चिंचोटी, नायगाव, सातीवली फाटा, पेल्हार, विरार अशा विविध ठिकाणी हा राडा रोडा टाकून दिला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नुकताच महामार्गावरील कोल्ही चिंचोटी येथील रस्त्यावर रात्री साडेतीनच्या सुमारास एक ट्रक चालक राडारोड्याने भरलेला ट्रक खाली करीत होता. याच दरम्यान नायगाव पोलिसांच्या गस्ती पथकाने या ट्रक चालकाला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी नायगाव पोलीसांनी सार्वजनिक रस्त्याचे विद्रुपीकरण व महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

वसई विरार शहरात अन्य शहरातील राडारोडा आणून टाकण्याचे प्रकार सर्रास पणे सुरू आहेत. असे असतानाही महापालिकेकडून अजूनही ठोस कारवाई केली जात नाही त्यामुळे महापालिकेच्या कार्यपद्धतीवरच आता नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केले जात आहे. महापालिका, पोलीस, महामार्ग प्राधिकरण, महसूल अशा सर्वच विभागाने एकत्र येऊन संयुक्त मोहीम राबावावी अशी मागणी ही नागरिक करीत आहेत.