वसई: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक ठरत असलेल्या उड्डाणपुलांच्या सुरक्षा कठड्यांची उंची वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, काम सुरू असताना ठेकेदाराकडून योग्य ती काळजी घेतली जात नसल्यामुळे काँक्रिटचे साहित्य थेट उड्डाणपुलाखालील रस्त्यावर पडत असून, अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वसई पूर्वेच्या भागातून गेलेला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा मुंबई, ठाणे, वसई-विरार, मीरा-भाईंदर, पालघर आणि गुजरातला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या महामार्गावरील खड्डे, पाणी साचणे आणि वाहतूक कोंडी या समस्यांवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून महामार्गाचे काँक्रिटीकरण करण्यात आले.
मात्र, या काँक्रिटीकरणामुळे रस्त्याची मूळ उंची वाढली. रस्त्याची उंची वाढल्यामुळे वर्सोवा पुलापासून ते विरार फाट्यादरम्यान असलेल्या ससूनवघर, मालजीपाडा, नायगाव, चिंचोटी, सातीवली फाटा, वसई फाटा, नालासोपारा फाटा, पेल्हार, विरार आणि शिरसाड या उड्डाणपुलांवरील मूळ सुरक्षा कठड्यांची उंची कमी झाली होती. पूर्वी तीन ते साडेतीन फूट असलेले हे कठडे रस्ता उंच झाल्याने अवघे दीड ते दोन फुटांवर आले. भरधाव किंवा अवजड वाहनांचा अपघात झाल्यास ती थेट पुलावरून खाली कोसळण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. याशिवाय उड्डाणपुलाखालील भागात नागरिकांची आणि वाहनांची नेहमीच वर्दळ असल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला होता.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उड्डाणपुलांच्या दोन्ही बाजूंच्या कठड्यांची उंची वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, हे काम करताना संबंधित ठेकेदाराकडून अत्यंत निष्काळजीपणा दाखवला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कामादरम्यान काँक्रिटचे साहित्य थेट उड्डाणपुलाखाली कोसळत असल्याने पुलाखालून जाणाऱ्या वाहनांवर किंवा पादचाऱ्यांवर ते पडल्यास गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी नालासोपारा फाटा भागात कामादरम्यान एक लोखंडी सळई खाली पडल्याची घटनाही घडली होती.
काम सुरू असताना पुलाखालील भागात योग्य ते बॅरिकेड्स लावणे, सुरक्षारक्षक तैनात करणे आणि स्पष्ट सूचना फलक लावणे अत्यंत आवश्यक असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तात्काळ आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी नागरिकांमधून केली जात आहे. उड्डाणपुलावर कठड्यांची उंची वाढविण्याचे काम करीत असताना योग्य ती काळजी घेण्यात यावी अशी सूचना ठेकेदारांना देण्यात आली आहे असे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
निम्म्याहून अधिक पूर्ण
वर्सोवा पुलापासून विरार शिरसाड पर्यंत सुमारे १२ किलोमीटर इतक्या लांबीच्या कठड्यांची उंची वाढविण्याचे काम सुरू केले आहे. त्यातील निम्म्याहून अधिक कठड्यांची उंची वाढविण्याचे काम पूर्ण झाले असून रंगरंगोटीची ही कामे पूर्ण झाली असल्याचे महामार्ग प्रकल्प व्यवस्थापक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे. उर्वरित काम ही लवकर पूर्ण करवून घेतले जाणार आहे.
साहित्य निकृष्ट दर्जाचे ?
महामार्गावर कचऱ्याची आणि कठड्यांची उंची वाढवण्याचे काम सुरू असले, तरी अनेक ठिकाणी अत्यंत सुमार व गंजलेल्या साहित्याचा वापर केला जात आहे. ओबडधोबड आणि निकृष्ट कामामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटण्याऐवजी अपघात वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने या निष्काळजीपणाची तात्काळ दखल घेऊन दर्जेदार काम करावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
