वसई: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलांच्या धोकादायक ठरत असलेल्या सुरक्षा कठड्यांची उंची वाढवण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. महामार्गाच्या काँक्रिटीकरणामुळे कमी झालेली कठड्यांची उंची आता पुरेशा प्रमाणात वाढवण्यात येत असल्याने, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असून संभाव्य अपघातांचा धोका टळणार आहे.
वसई पूर्वेच्या भागातून गेलेला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा मुंबई, ठाणे, वसई-विरार, मीरा-भाईंदर, पालघर आणि गुजरातला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या महामार्गावरील खड्डे, पाणी साचणे आणि वाहतूक कोंडी या समस्यांवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून महामार्गाचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. मात्र, या काँक्रिटीकरणामुळे रस्त्याची उंची वाढली होती.
रस्त्याची उंची वाढल्यामुळे वर्सोवा पुलापासून ते विरार फाट्या दरम्यान असलेल्या ससूनवघर, मालजीपाडा, नायगाव, चिंचोटी, सातीवली फाटा, वसई फाटा, नालासोपारा फाटा, पेल्हार, विरार आणि शिरसाड या उड्डाणपुलांच्या मूळ सुरक्षा कठड्यांची उंची कमी झाली होती. पूर्वी अडीच ते तीन फूट असलेले हे कठडे रस्त्यामुळे अवघे दीड ते दोन फुटांवर आले होते. भरधाव किंवा अवजड वाहनांचा अपघात झाल्यास ती थेट पुलावरून खाली कोसळण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. याशिवाय उड्डाणपुलाखालील भागात नागरिकांची आणि वाहनांची नेहमीच वर्दळ असल्याने हा सुरक्षेचा मुद्दा अत्यंत गंभीर बनला होता.
नागरिकांची सुरक्षितता आणि संभाव्य मोठा धोका लक्षात घेता प्राधिकरणाने वर्सोवा ते विरार फाटा दरम्यानच्या सर्व उड्डाणपुलांच्या सुरक्षा कठड्यांची उंची वाढवण्याचे काम सुरू केले असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे.
