​वसई: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सध्या बेकायदेशीर जाहिरात आणि शुभेच्छा फलकांचा सुळसुळाट झाला असून, हे फलक वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत.

वसई पूर्वेच्या पट्ट्यातून जाणाऱ्या या महामार्गावर दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, वर्सोवा ते सकवार दरम्यान असलेल्या चिंचोटी, मालजीपाडा, पेल्हार, वसई फाटा, विरार, सातीवली आणि शिरसाड या भागांतील उड्डाणपुलांवर राजकीय पक्षांचे फलक, वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि विविध जाहिरातींचे अनधिकृत फलक मोठ्या प्रमाणात लावले जात आहेत. वाऱ्याच्या वेगामुळे हे कापडी फलक फाटून थेट महामार्गावर लोंबकळत असल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनचालकांचे लक्ष विचलित होत आहे.

​अनेकदा हे फलक पूर्णपणे तुटून रस्त्यावर येतात, ज्यामुळे एखादा मोठा अपघात घडण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, ज्या कारणासाठी हे फलक लावले जातात, तो कार्यक्रम संपून बराच काळ उलटला तरीही ते काढले जात नाहीत. हे जीर्ण झालेले फलक वर्षानुवर्षे उड्डाणपुलांना लटकत राहिल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

या प्रकारामुळे संताप व्यक्त करत, महामार्ग प्राधिकरणाने या बेकायदेशीर फलकांकडे गांभीर्याने लक्ष देऊन ते तातडीने हटवावेत आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता वाहनचालकांकडून केली जात आहे.

महामार्गवर धोकादायक पद्धतीने लोंबकळत असलेले जाहिरात फलक देखभाल दुरुस्ती करणारे पथक आहे त्यांना सूचना देऊन काढून टाकले जातील असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे. नागरिकांनी महामार्गावर, उड्डाणपुलावर फलक लावू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.