वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुख्य रस्त्याच्या मध्ये वाहने बेकायदेशीरपणे वाहने उभी केली जात आहेत. या वाहनांमुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. तर दुसरीकडे या वाहनांमुळे अपघात होण्याचा धोका ही अधिक वाढला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, वसई विरार, यासह अन्य भागांना जोडणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे.
या महामार्गावरून दररोज मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. विशेषतः मालवाहतूक करणारी वाहने ही या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रवास करतात.

वसई, पालघर, भिंवडी, ठाणे, अशा भागात औद्योगिक क्षेत्र ही विस्तारत आहे. त्यामुळे त्या वसाहतीमध्ये कंटेनर व ट्रक द्वारे मालाची ने आण करण्यासाठी सातत्याने अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. काही मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना माल गाडीत भरणे- उतरविणे, महामार्गावरून अवजड वाहने चालविण्याची वेळ मर्यादा, विश्रांती साठी मुक्काम करावा लागतो. परंतु वसई विरार मधील महामार्गाच्या ठिकाणी ही बेकायदेशीर पणे वाहने मुख्य प्रवास मार्गावरच उभी केली जात आहेत.

मुख्य रस्त्याच्या वाहिनीवर उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते तर काही वेळा वाहने रस्तावर उभी असल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांची धडक लागून अपघात घडू लागले आहेत. विशेषतः रात्रीच्या सुमारास या घटना अधिकच घडत आहेत.
यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे वाहनांना धडका लागून अपघात घडले आहेत. असे असतानाही त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अशा ट्रक चालकांवर वेळोवेळी कारवाई होत असते असे पोलिसांनी सांगितले आहे.

संरक्षक जाळ्या नंतर ही वाहने मुख्य रस्त्यावर
प्रवासादरम्यान महामार्ग सुरक्षित राहावा यासाठी प्राधिकरणाने जाळ्या बसविल्या आहेत. मात्र तरी सुद्धा अवजड वाहनचालक हे वाहने थेट मुख्य रस्त्यावरच उभी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वाहने रस्त्याच्या मध्येच उभी राहत असल्याने रस्ता अरुंद होऊन वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. याशिवाय अपघात होण्याचा धोका ही वाढला.

बेकायदेशीर व धोकादायक पध्दतीने वाहने उभी करणाऱ्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने सर्रास पणे अशी वाहने उभी केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महामार्गावर वाहने मध्ये उभी राहू नये यासाठी आम्ही वाहतूक पोलिसांना अधूनमधून सूचना देऊन सांगत असतो. त्यांनी त्यावर कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे.

ट्रक टर्मिनलचा अभाव
राष्ट्रीय महामार्गावरून दररोज २० ते २५ हजार वाहनांचा प्रवास होत असतो. त्यापैकी ७० टक्के वाहने ही अवजड मालवाहतूक करणारी आहेत. असे असतानाही पालघर पासून ते वर्सोवा पूल या दरम्यान वाहने उभी करण्यासाठी शासन स्तरावरून ट्रक टर्मिनलचे नियोजन करण्यात आले नाही.त्यामुळे ही अवजड वाहने थेट मुख्य रस्त्यावर बेकायदेशीर पणे उभी केली जात आहेत.