वसई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे, पनवेल आणि मुंबई परिसरातून उंच व भव्य गणेशमूर्तींचे वसई-विरारमध्ये आगमन सुरू झाले आहे. मात्र, मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे गणेश भक्तांसमोर प्रवासाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. खड्ड्यांमुळे मूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. त्यामुळे तातडीने खड्डे बुजविण्यात यावेत अशी मागणी करण्यात येत आहे.
नुकतीच मुंबईतील भुलेश्वरच्या महाराजांची उंच गणेशमूर्ती अंगावर पडून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तींची वाहतूक करताना अत्यंत खबरदारी बाळगणे गरजेचे बनले आहे.वसई विरार शहरात मुंबई, ठाणे, पनवेल, भाईंदर अशा भागातून सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्ती येत असतात. त्या महामार्गावरूनच आणल्या जातात. मात्र सद्यस्थितीत महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडून रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे गणेशमूर्ती आणताना मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे गणेश भक्तांनी सांगितले आहे.
कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने महामार्गावरील खड्डे बुजवून रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित करावेत, अशी जोरदार मागणी गणेश भक्तांकडून केली जात.सध्या महामार्गासह अंतर्गत रस्त्यांचीही खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. ‘नायगावचा नवसा गणपती मंडळ’ १४ फुटांची गणेशमूर्ती अंधेरी येथून आणत असल्याने महामार्ग व अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवासात मोठा धोका निर्माण झाला आहे; त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी मंडळाचे विश्वस्त किरण जाधव यांनी केली आहे.दरम्यान, महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम वेगाने सुरू असून लवकरच कामे पूर्ण होतील असा दावा महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने केला आहे.
अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती होणार
केवळ महामार्गाच नाही तर महामार्गावरून वसई विरार शहराच्या अंतर्गत भागाला जोडणाऱ्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. याबाबत महापालिकेत आयोजित बैठकीत ही गणेश मंडळांनी प्रश्न उपस्थित केले होते.गणेशोत्सवा आधीच शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविणे, पॅच वर्क अशी कामे पूर्ण केली जातील असे आश्वासन महापौर अजीव पाटील व महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी.यांनी दिले आहे.
