वसई: पावसाळ्याचे आगमन होताच वसई-विरार शहरातील विविध भागांतील रस्त्यांची दुरवस्था समोर आली असून, जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेषतः वसई पूर्वेकडून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर यंदाही मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे विदारक चित्र असून, यामुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जुन्या वर्सोवा पुलाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. पुलावर अनेक ठिकाणी खोल खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी हे खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करणे अपेक्षित होते. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. प्राधिकरणाच्या या निष्काळजीपणामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना दररोज धोकादायक आणि जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. काही ठिकाणी खड्डे इतके खोल झाले आहेत त्याचे हादरे वाहनांना बसतात. तर दुसरीकडे वाहने कलंडून जाण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
केवळ वर्सोवा पूलच नाही, तर वर्सोवा पुलापासून ते थेट विरार फाट्यादरम्यान महामार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांची मालिका पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात आले होते, त्यावर मारलेला डांबराचा मुलामा पावसाच्या पहिल्या काही दिवसांतच जागोजागी उखडला गेला आहे. यामुळे रस्ता अत्यंत असुरक्षित बनला आहे. त्यात दुचाकी आणि चारचाकी वाहने घसरून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरवर्षी पावसाळ्यात या महामार्गाची हीच अवस्था असते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टोल वसूल करते, पण रस्त्यांची डागडुजी वेळेवर का करत नाही? एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून केला जात आहे.
