वसई:- वसई-विरार शहरात महावितरणकडून जुने वीज मीटर बदलून त्याजागी नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र या स्मार्ट मीटरमुळे वीजदेयकात अवाजवी आणि दुप्पट वाढ होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. तसेच ग्राहकांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता जुने मीटर काढून नवीन मीटर लावले जात असल्याने महावितरणविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर वसई-विरारमधील सर्वच राजकीय पक्ष आता या मुद्द्यावर एकवटले असून प्रशासनाविरोधात एल्गार पुकारत येत्या ७ सप्टेंबर रोजी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शिरसाड फाटा, के. टी. रिसॉर्टसमोर ‘महामार्ग रोको’ आंदोलन केले जाणार आहे.

​याबाबत बुधवारी वसई-विरार शहर महापालिकेचे महापौर अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत वाढीव वीज बिलं आणि मीटर बदलण्याच्या मनमानी कारभारावर सविस्तर चर्चा होऊन आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), मनसे आणि लाल बावटा यांसारख्या विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.७ सप्टेंबरला होणाऱ्या आंदोलनादरम्यान महावीतरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय तातडीने मागे घेण्याची अधिकृत मागणी केली जाणार आहे.

या आंदोलनाबाबत भूमिका मांडताना महापौर अजीव पाटील यांनी स्पष्ट केले की, स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज देयके येत असल्याने वसई-विरारची जनता अत्यंत त्रस्त झाली आहे. महावितरणच्या या मनमानी कारभाराविरोधात आणि शासनाकडे नागरिकांच्या हक्काची दाद मागण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. ​तसेच, शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी जिल्हा संघटक किरण चेंदवणकर यांनी सर्वसामान्यांच्या व्यथा मांडत म्हटले, की अवाजवी बिलांमुळे तुटपुंजा पगार असणाऱ्या कष्टकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना जगणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत ही दरवाढ त्यांना कशी परवडणार? म्हणूनच आम्ही हे आंदोलन उभे करत असून, यात स्थानिक महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

​काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. दिनेश कांबळे यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या मनात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कोणाचीही परवानगी न घेता मीटर बदलले जात आहेत आणि भरमसाठ बिलं पाठवली जात आहेत. त्यामुळे ७ तारखेला रास्ता रोको आंदोलन करून या स्मार्ट मीटरची हंडी फोडली जाईल असे त्यांनी सांगितले.