वसई: ​मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि पालघरला थेट गुजरातशी जोडणारा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. नागरिकांनी जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडू नये आणि मोकाट जनावरांचा महामार्गावरील वावर रोखता यावा, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लाखो रुपये खर्च करून बसवलेल्या लोखंडी सुरक्षाजाळ्यांची अवघ्या काही महिन्यांतच दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी या जाळ्यांची दुरवस्था झाली असून, प्राधिकरणाचा भोंगळ कारभार आणि कामाच्या सुमार दर्जावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

वसई पूर्वेच्या भागातून गेलेल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय

​महामार्गालगत असंख्य गावे आणि पाडे आहेत. येथील नागरिकांना दळणवळणासाठी महामार्गावरच अवलंबून राहावे लागते. अनेकदा पादचारी धोकादायक पद्धतीने महामार्ग ओलांडतात, तर कधी मोकाट जनावरे अचानक रस्त्यावर आल्याने भीषण अपघात घडतात. यावर उपाय म्हणून प्राधिकरणाने वर्सोवा पुलापासून ते विरार फाट्यादरम्यान चिंचोटी, बापाणे, सातीवली, वसई फाटा, पेल्हार, विरार महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मजबूत सुरक्षाजाळ्या बसवल्या होत्या. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या सुरक्षेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

जाळ्या गायब झाल्याने आता पुन्हा नागरिक आणि मोकाट जनावरे थेट महामार्गाच्या मध्यभागी येत आहेत. यामुळे वेगवान वाहनांचा अपघात होण्याचा धोका कैक पटीने वाढला आहे. अपघात होऊन निष्पाप जीवांचा बळी जाण्यापूर्वी या तुटलेल्या जाळ्यांची तातडीने युद्धपातळीवर दुरुस्ती करावी व जे जाळ्यांचे नुकसान करीत असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ऑइल विक्रेत्यांचे ‘अतिक्रमण‘ ?

​सध्या महामार्गावरील चित्र अत्यंत भीषण आहे. अनेक ठिकाणी या जाळ्या तुटून मोठी भगदाडे पडली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, महामार्गालगत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या काही ऑइल विक्रेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी या शासकीय जाळ्या चक्क तोडून स्वतःसाठी ‘विशेष रस्ते’ तयार केले आहेत. महामार्गावरून राजरोसपणे असे कृत्य सुरू असताना महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि गस्त घालणारी पथके नेमकी काय करत आहेत? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

​जाळ्या बसवून अवघे काही महिने झाले असताना त्या गंजून किंवा सहजपणे कशा तुटल्या? कंत्राटदाराच्या कामाची गुणवत्ता तपासली गेली होती का, हा मोठा प्रश्न आहे.

तर दुसरीकडे त्यांची योग्य रित्या देखभाल होणे ही आवश्यक आहे. तसे न झाल्याने आज महामार्गावरील सुरक्षा जाळ्यांची अवस्था बिकट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. “ महामार्गावर नागरिकांनी ओलांडून प्रवास करू नये यासाठी या जाळ्या बसविल्या आहेत. काही ठिकाणी त्या तुटलेल्या आहेत असे दिसून आले आहे. त्यांची दुरुस्ती केली जाईल. याशिवाय जे जाळ्या तोडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.” – सुहास चिटणीस, व्यवस्थापक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण