वसई: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहने अनियंत्रित होऊन पलटी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहेत. मंगळवारी सकाळच्या सुमारास पुन्हा एकदा महामार्गावरील सातीवली खिंडीजवळ कंटेनर पलटी होऊन उलटल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून गुजरात वाहिनीवर भीषण वाहतूक कोंडीची निर्माण झाली आहे.

वसई पूर्वेच्या भागातून गेलेल्या या राष्ट्रीय महामार्गावर दररोज हजारो वाहनांची प्रचंड वर्दळ असते. मात्र, महामार्गाच्या दुरवस्थेमुळे येथे अपघातांची मालिका सुरूच आहे. रस्त्यावर करण्यात आलेल्या व्हाईट टॉपिंगचे अनेक पॅनेल खचल्यामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी उंच-सखल परिस्थिती निर्माण झाली आहे. या खराब रस्त्यांमुळे आणि चालकांच्या बेदरकार वेगामुळे भरधाव जाणारी अवजड वाहने अनियंत्रित होऊन रस्त्यावर पलटी होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. यापूर्वी पालघर आणि त्यानंतर तुंगारफाटा येथे रसायन टँकर व दुधाची गाडी उलटली होती.

या घटना ताज्या असतानाच आता मंगळवारी सकाळी सातीवली खिंडीत कंटेनर पालघर , गुजरात च्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर उलटला होता. कंटेनर रस्त्याच्या मध्येच उलटल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक मंदावली. जवळपास पाच ते सहा किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर दुसरीकडे काही वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने वाहने दामटल्याने चिंचोटी जवळील भागात मुंबई दिशेने जाणाऱ्या मार्गावर भीषण कोंडी झाली. या कोंडीचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे.घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर बाजूला हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे असे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.