वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूलासह विविध ठिकाणी पथदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, मागील महिनाभरापासून पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने वर्सोवा पुल ते विरार फाटा या दरम्यान बहुतांश ठिकाणी पथदिवे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास प्रवास करताना वाहन चालकांना अंधारयात्रा करावी लागत आहे.

वसई पूर्वेतील भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या मार्गावरून रात्रीच्या सुमारास वाहनचालकांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी उड्डाणपूलावर व मार्गावर पथदिवे लावण्यात आले आहेत. मात्र, महामार्गावर लावण्यात आलेले पथदिवे मागील काही महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

आधीच महामार्गावर खड्डे, धूळ, अतिक्रमण यासह विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असताना, महामार्गावर विविध ठिकाणी बसविण्यात आलेले पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे महामार्गावरील काही ठिकाणचे पथदिवे बंद दुरुस्त करण्याची तर काही भागात नव्याने पथदिवे बसविण्याची गरज निर्माण झाली आहे.

पथदिवे नसल्याने रात्रीच्या अंधारात प्रवास करताना

रस्त्यांचा अंदाज येत नाही तर दुसरीकडे काही वेळा अवजड वाहने महामार्गावर रस्त्यात मधेच बंद अवस्थेत उभी असतात। यामुळे वाहने उलटून अपघात होण्याचा तसेच वाहने उड्डाणपुलावरून खाली पडण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तर वर्सोवा ते विरार फाट्यादरम्यान ससूनवघर, नायगाव, चिंचोटी, सातीवली, वसई फाटा, पेल्हार, नालासोपारा, विरार असे उड्डाणपूल आहेत. याठिकाणी पथदिवे बंद असल्याने मोठ्या अडचणी येत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे याकडे सातत्याने तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याकडे लक्ष न दिल्याने आजही अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याचे चित्र दिसून येत असल्याचे नगरसेवक किशोर पाटील यांनी सांगितले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महामार्गावरील बंद पथदिव्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी पाटील यांनी प्राधिकरणाकडे केली आहे.

तांत्रिक अडचणीमुळे पथदिवे बंद

महामार्गावर जवळपास चारशे हून अधिक पथदिवे लावण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी विद्युत वाहिनीत बिघाड, काही ठिकाणी वाहिन्या चोरून नेल्याने तांत्रिक अडचणी येत आहेत. त्याची दुरुस्तीची कामे सुरू आहेत. याशिवाय पथदिवे दुरूस्त करण्यासाठी येता आठ ते दहा दिवसात नवीन एजन्सी नियुक्त करून देखभालीची कामे करवून घेतली जाणार आहे असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे. तसेच काही ठिकाणी महावितरणचे देयके भरण्यात अडचणी येत असल्याने महावितरणकडून वीज पुरवठा खंडित केला जातो. आता देयके भरताना ज्या अडचणी येतात एकत्रित बसून सोडविल्या जातील असेही त्यांनी सांगितले आहे.