वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील बावखल येथे शुक्रवारी पहाटे एक मोठी दुर्घटना घडली. एका भरधाव जाणाऱ्या ट्रेलरने धडक दिल्यामुळे वसई-विरार शहर महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणारी सूर्या प्रकल्पाची मुख्य पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. याच महामार्गालगत वसई विरार शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सुर्या योजनेची मुख्य पाईपलाईन अंथरण्यात आली आहे. शुक्रवारी विरार जवळील बावखल परीसरात पाईपलाईन फुटल्याची घटना घडली आहे. पाईपलाईन फुटल्याने त्यातून पाण्याचे २० ते २५ फूट उंच फवारे उडत होते. पाईपलाईन फुटून गेल्याने त्यातून लाखो लीटर पाणी वाया गेले आहे.

या घटनेची माहिती वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला मिळताच घटनास्थळी धाव घेत पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी शिरसाड येथे ही कंटेनरच्या धडकेत पाईपलाईन फुटली होती. त्यानंतर खानिवडे येथेही जलवाहिनी फुटल्याची घटना घडली होती.

सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहरात आधीच गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यातच आता पाईपलाईन फुटल्याने पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर जपून करावा आणि आरोग्य जपण्यासाठी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.